नाशिक : जिल्ह्यातील बोगस डॉक्टरांचा प्रश्न विधान भवनात

नाशिक : बोगस डॉक्टरांचा प्रश्न विधानभवनात,www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

जिल्ह्यात बोगस डॉक्टरांबाबत अनेक तक्रारी जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने तालुका अधिकाऱ्यांकडे वर्ग केल्या असल्या तरी तालुका स्तरावरून एकाही तक्रारीचा अहवाल प्राप्त होत नाही. असे वेळोवेळी घडत आहे. यावरून कळवण विधानसभा मतदारसंघाचे आमदार नितीन पवार आणि चांदवड विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ. राहुल आहेर यांनी विधान भवनात प्रश्न विचारला असून, त्याबाबत जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडे माहिती मागविण्यात आली आहे.

दरम्यान, गेल्या दोन महिन्यांत दैनिक ‘पुढारी’ने बोगस डॉक्टरांबाबत जिल्हा परिषद टाळाटाळ करत असल्याचे वेळोवेळी बातम्यांमधून समोर आणले होते. याबाबत जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यादेखील चौकशी करणार असे सांगण्यात आले होते. आता थेट विधान भवनातूनच माहिती मागवली गेल्याने जिल्हा परिषदेत हा चर्चेचा विषय झाला आहे.

आ. पवार आणि आ. डॉ. आहेर यांनी वस्तुनिष्ठ प्रश्न विचारला असून, यामध्ये कळवण, इगतपुरी, नांदगाव, मालेगाव, सिन्नर, निफाड आणि दिंडोरी आदी तालुक्यांची माहिती मागवली आहे. जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने याबाबतीत माहिती अद्ययावत करून पाठवल्याची माहिती आरोग्य विभागाकडून प्राप्त झाली.

स्मरणपत्राचा विसर

दरम्यान, गेल्या दोन वर्षांत जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागात बोगस वैद्यकीय प्रॅक्टिस करणाऱ्यांबाबत २३ तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. यामध्ये इगतपुरी तालुक्यातील ७, नांदगाव तालुक्यातील ५, मालेगाव तालुक्यातील ३, सिन्नर आणि निफाड २ तर दिंडोरी, बागलाण, नाशिक आणि नाशिक मनपा या ठिकाणाहून प्रत्येकी १ वेळोवेळी आरोग्य विभागाने या तक्रारी तालुका स्तरावर पाठवून त्याबाबत काय कारवाई केली, याबाबत अहवाल मागवला होता. मात्र, तालुका स्तरावरून गेल्या दोन वर्षांत एकही अहवाल प्राप्त झाला नाही आणि जिल्हा परिषदेने त्याबाबत संबंधित तालुका आरोग्य अधिकाऱ्यांना स्मरणपत्र पाठविण्याची तसदी घेतली नसल्याने हे बोगस डॉक्टर सर्वसामान्यांच्या जिवाशी खेळत असल्याचे समाेर आले होते.

त्रिसदस्यीय समिती गठीत

बोगस डॉक्टरांच्या तक्रारी निकाली काढण्यासाठी तहसीलदारांच्या अध्यक्षतेखाली अध्यक्षांसह त्रिसदस्यीय समिती गठीत करण्यात आलेली आहे. या समितीमध्ये तालुका आरोग्य अधिकारी हे सदस्य सचिव तर जिल्हा परिषदेचे विस्तार आरोग्य अधिकारी हे सदस्य आहेेत. ज्या नागरिकांना बोगस डॉक्टरांबाबत संशय येतो त्यांच्यामार्फत जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्याकडे तक्रार करण्यात येते. ही तक्रार प्राप्त झाल्यानंतर तालुका वैद्यकीय अधिकारी यांच्याकडे वर्ग करून त्यावर काय कारवाई केली, याबाबतचा अहवाल मागवला जातो. याबाबत बोगस डॉक्टरांवर कारवाई करण्याचे अधिकार या समितीला देण्यात आलेले आहेत. मात्र अद्याप याबाबत एकाही बोगस डॉक्टरवर कारवाई झालेली नसल्याचे समोर आले आहे.

धोरण आखण्याची गरज 

वर्षभरापूर्वी शहरातील उपनगर येथून अशाच एका बोगस डॉक्टरला दहशतवादविरोधी पथकाने पकडले होते. त्यामुळे या प्रकारे जर आरोग्य विभाग बोगस डॉक्टरांना पाठीशी घालत असेल तर हे सर्वसामान्यांच्या जिवाशी खेळ ठरणार आहे. याबाबत प्रशासनाने ठोस भूमिका घेत या डॉक्टरांवर कारवाई करण्यासाठी धोरण आखले पाहिजे.

२०२० मध्ये प्राप्त तक्रारी

निफाड २, बागलाण १, मालेगाव १

—–

२०२१ मध्ये प्राप्त तक्रारी

नांदगाव ४, नाशिक १, मालेगाव १, नाशिक मनपा १,


हेही वाचा :

The post नाशिक : जिल्ह्यातील बोगस डॉक्टरांचा प्रश्न विधान भवनात appeared first on पुढारी.