Site icon

नाशिक जिल्ह्यातील मुंजवाड गावात राजकीय पुढाऱ्यांना प्रवेशबंदी, ‘हे’ आहे कारण

सटाणा (जि. नाशिक) : सुरेश बच्छाव

तालुक्यातील मुंजवाड ग्रामस्थांनी सर्वपक्षीय राजकीय पुढाऱ्यांना गावात प्रवेशबंदी घोषित केली आहे. रविवारी (दि. २१) याबाबत एकमुखाने निर्णय घेत ग्रामस्थांनी गावात प्रवेश करणाऱ्या सर्व प्रमुख रस्त्यांवर या गावबंदीचे फलक झळकावले. कांदा उत्पादक शेतकरी व शेतकरी क्रांती मोर्चा ग्रुपच्या वतीने हा निर्णय घेण्यात आला असून राजकीय पुढाऱ्यांनी गावात प्रवेश केल्यास त्यांच्यावर कांदे फेकून स्वागत केले जाईल, असा इशारा देण्यात आला आहे.

सद्यस्थितीत कांद्याचे दर मोठ्या प्रमाणात गडगडले आहेत. एकीकडे अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे कांदा उत्पादन मोठ्या प्रमाणात खराब होऊन शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. दुसरीकडे या नैसर्गिक संकटातून कशाबशा बचावलेल्या उत्पादनालाही बाजारपेठेत अत्यल्प दर मिळत आहे. सद्यस्थितीत चांगल्या प्रतीचा कांदा अवघ्या दोन ते चार रुपये प्रतिकिलो दराने विकला जात आहे. यातून उत्पादनखर्च दूरच, पण नुसते बाजार समितीपर्यंत माल नेण्याचे वाहनाचे भाडेही सुटत नाही. त्यामुळे शेतकरीवर्ग कमालीचा हवालदिल झाला आहे. गडगडलेल्या कांदा बाजारभावामुळे शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले असले, तरी राजकीय पुढाऱ्यांकडून मात्र याकडे सपशेल दुर्लक्ष केले जात आहे. शेतकऱ्यांच्या मनात मोठ्या प्रमाणात असंतोष धुमसत असून त्याची परिणिती म्हणून मुंजवाड ग्रामस्थांनी थेट राजकीय पुढा-यांसाठी प्रवेशबंदी घोषित केली आहे.

मुंजवाड येथील तरुण शेतकऱ्यांनी शेतकरी क्रांती मोर्चा ग्रुप तयार केला आहे. या माध्यमातून आतापर्यंत पुणतांबा धर्तीवर ग्रामसभेत ठराव करून बंद, धरणे आंदोलन, खासदारांना घेराव, तहसीलदारांना निवेदन आदी आंदोलने झाली आहेत. सद्यस्थितीतील कांदादराच्या प्रश्नीदेखील शासनाचे लक्ष वेधण्यासाठी रविवारी (दि. २१) एकत्रित जमून शेतकऱ्यांनी घोषणाबाजी केली.

गावात प्रवेश करणाऱ्या चारही दिशांच्या प्रमुख मार्गांवर राजकीय पुढाऱ्यांना प्रवेशबंदीचे फलक झळकवले. यावेळी कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी करत शासन व राजकीय पुढाऱ्यांचा निषेध नोंदविण्यात आला.

इतर गावांनीही पुढाकार घ्यावा.. 
कांदा कवडीमोल भावाने विक्री होतोय. इतर भाजीपाल्यालाही भाव नाही. शेतकऱ्यांवर आर्थिक संकट कोसळले असताना अवकाळी, गारपिटीचे अनुदानही मिळाले नाही. राजकीय पुढारी शेतकऱ्यांचे प्रश्न दुर्लक्षित करीत असतील, तर त्यांना गावात प्रवेश का द्यायचा? कोणी पुढाऱ्याने किंवा लोकप्रतिनिधीने गावात प्रवेश केल्यास, त्यांच्यावर कांदे फेकून स्वागत होईल. इतर कांदा उत्पादक गावांनीही असा निर्णय घ्यावा, असे शेतकरी क्रांती मोर्चा ग्रुपचे समन्वयक केशव सूर्यवंशी यांनी केले.

हेही वाचा :

The post नाशिक जिल्ह्यातील मुंजवाड गावात राजकीय पुढाऱ्यांना प्रवेशबंदी, 'हे' आहे कारण appeared first on पुढारी.

Exit mobile version