नाशिक जिल्ह्यातील शाळा ४ जानेवारी पासून सुरू होणार :  पालकमंत्री भुजबळ

नाशिक : सध्या जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या घटत असून बऱ्या होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण अधिक आहे. यामुळे अॅक्टिव्ह रुग्णांच्या संख्येतही दररोज घट होत आहे. ही परिस्थिती लक्षात घेता जिल्ह्यातील शाळा येत्या चार जानेवारीपासून सुरू करणार असल्याची माहिती पालकमंत्री छगन भुजबळ यांनी आज येथे दिली. इयत्ता नववी ते बारावी पर्यंत वर्ग सुरू करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. 

शहरातील शाळा, महाविद्यालयांना तयारीच्या सूचना 

जिल्हाधिकारी कार्यालयात शनिवारी पार पडलेल्या आढावा बैठकीनंतर ते बोलत होते.  भुजबळ म्हणाले की, ग्रामीण भागातील शाळा सुरू करणे बाबत प्रशासन अनुकूल आहे. नाशिक महापालिका क्षेत्रातील इयत्ता नववी ते बारावी चे वर्ग सुरू करण्याबाबत पुढील बैठकीत अंतिम निर्णय घेतला जाईल. तत्पूर्वी मुंबई, ठाणे आणि पुणे येथील प्रशासन शाळा सुरू करण्याबाबत काय निर्णय घेते, याचा आढावा देखील घेतला जाईल. दरम्यान शाळा सुरू होणार असल्याने शैक्षणिक संस्था, विद्यालय, कनिष्ठ महाविद्यालय यांना तयारी संदर्भात आवश्यक सूचना केल्या जात आहेत. यात प्रामुख्याने शिक्षकांची आरोग्य तपासणी, शालेय प्रांगणाची स्वच्छता, निर्जंतुकीकरण तसेच अन्य तयारी करण्यासंदर्भात सुचविले आहे.

हेही वाचा >> बळीराजाच्या नशिबी दुर्दैवच; जेव्हा स्वत:च्याच डोळ्यादेखत संसाराची राखरांगोळी होते तेव्हा..

अन्य इयत्तासंदर्भात निर्णय नाही

यापूर्वी घेतलेल्या निर्णयानुसार इयत्ता नववी ते बारावीचे वर्ग चार जानेवारीपासून सुरू केले जाणार आहेत. अन्य इयत्ता संदर्भात कुठलाही निर्णय सध्या घेतलेला नाही. केंद्र व राज्य पातळीवर याबाबत धोरण ठरल्यानंतर अंतिम निर्णय घेतला जाईल, असे भुजबळ यांनी यावेळी स्पष्ट केले.

हेही वाचा >> मनाला चटका लावणारी बातमी! माऊलीच्या नशिबी दोनदा दफनविधी अंत्यसंस्काराचा योग; जुळली मुलांशी झालेली ताटातूट