नाशिक जिल्ह्यातील २५ खाटांचा विस्तार ९७० ऑक्सिजन खाटांपर्यंत; सार्वजनिक आरोग्याचे बळकटीकरण 

नाशिक : कोरोना विषाणू संसर्गाचा फैलाव झाला असताना नव्याने उद्‌भवलेल्या राष्ट्रीय आपत्तीला तोंड देण्यात सार्वजनिक आरोग्य यंत्रणेवर कमालीचा ताण आला होता. त्यामागे कारणही तसेच होते. उपलब्ध आरोग्य सुविधांची व्यवस्था तोकडी होती. जिल्हा रुग्णालयातील १५ आणि मालेगावमधील सामान्य रुग्णालयात दहा खाटा अतिदक्षता विभागात होत्या. त्यासाठी ऑक्सिजनची सुविधा उपलब्ध होती. गेल्या वर्षभरात सार्वजनिक आरोग्याच्या बळकटीकरणावर भर दिला गेला. आता मात्र सरकारी १५ आणि खासगी आठ अशा २३ डेडीकेटेड कोरोना हेल्थ सेंटरमधून ऑक्सिजनच्या ९७० खाटांपर्यंत विस्तार झाला आहे. शिवाय प्रत्येक तालुक्यात किमान ५० ऑक्सिजनच्या खाटा आणि चार व्हेटिंलेटरची सोय झाली. 

 हेही वाचा - स्‍वयंपाकगृह ते थेट 'CA'! गिरणी व्‍यावसायिकाच्या लेकीची उत्तुंग भरारी

प्रत्येक तालुक्यात ५० खाटा अन्‌ चार व्हेटिंलेटरची सुविधा 
जिल्ह्यात आठ एम. डी. फिजिशियन उपलब्ध आहेत. त्यांचे ऑनलाइन मार्गदर्शन उपलब्ध होत आहे. व्हिडिओ कॉल अथवा ई-संजीवनी सेवेचा उपयोग त्यासाठी केला जात आहे. जिल्ह्यात १०७ प्राथमिक आरोग्य केंद्रे आणि २४ ग्रामीण व सहा उपजिल्हा रुग्णालय, तर मालेगावमध्ये एक सामान्य, नाशिकमध्ये एक जिल्हा रुग्णालय अशी सार्वजनिक आरोग्य सेवेची व्यवस्था आहे. प्रत्येक ग्रामीण व उपजिल्हा रुग्णालयाप्रमाणे प्राथमिक आरोग्य केंद्रात स्वॅबची सोय करण्यात आली असून, फीव्हर क्लिनिक सुरू करण्यात आले आहे. गेल्यावर्षी एप्रिल, मे, जूनपर्यंत जिल्हा सरकारी आणि मालेगावच्या सामान्य रुग्णालयात कोरोना रुग्णांची सुश्रुषा केली जात होती. गेल्या वर्षी जुलैमध्ये १७ कोरोना केअर सेंटर आणि तीन तालुक्यांसाठी एक ग्रामीण रुग्णालय असे सात डेडीकेटेड कोरोना हेल्थ सेंटर सुरू करण्यात आले.

सार्वजनिक आरोग्याचे बळकटीकरण 

हेल्थ सेंटरमधून २५० ऑक्सिजन खाटांची आणि केअर सेंटरमधून एक हजार ५८७ खाटांची सोय झाली. त्यात सिन्नरमधील तळमजला, लासलगाव, चांदवडचे नेमिनाथ जैन होमिओपॅथी कॉलेज, नगरसूल, अभोणा, देवळाली कॅन्टोन्मेंट रुग्णालय, झोडगेचा समावेश होता. पंचवीस दिवसांनंतर पुढे तीन कोरोना केअर सेंटर आणि नऊ डेडीकेटेड कोरोना हेल्थ सेंटर सुरू करण्यात आले. निफाड, नांदगाव, दिंडोरीसाठी प्रत्येकी दोन कोरोना केअर सेंटर सुरू होत असताना २० केअर सेंटरमधील खाटा एक हजार ६७० झाल्या. नव्याने त्र्यंबकेश्‍वर, वणी, डांगसौंदाणे, इगतपुरी, पिंपळगाव, पेठ, चांदवड असे हेल्थ सेंटर मंजूर करत सटाणाचे हेल्थ सेंटर ‘स्टँड बाय’ ठेवत मनमाडमधील रेल्वे रुग्णालय शोधून ठेवण्यात आले. अशा एकूण १६ हेल्थ सेंटरमधील ऑक्सिजन खाटांची संख्या ५५० पर्यंत पोचली. खासगी डॉक्टरांची मदत कोरोना केअर सेंटरसह हेल्थ सेंटरसाठी घेण्यास सुरवात झाली. 

हेही वाचा - दशक्रियाची विधी पडली महागात! वारंवार सांगूनही नियमांची एैशीतैशी; परिसरात खळबळ

‘सकाळ'चा कोरोना चाचणी प्रयोगशाळेसाठीचा पाठपुरावा 
धामणगावच्या एसएमबीटी वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात गेल्या वर्षी १ ऑगस्टला डेडीकेटेड कोरोना हेल्थ सेंटरसाठी ४० ऑक्सिजन खाटांची व्यवस्था केली गेली. पुढे त्यात २० खाटांची भर पडली. ७ ऑगस्टला जिल्हा रुग्णालयात कोरोना चाचणी प्रयोगशाळेचे उदघाटन झाले. त्या वेळी दिवसाला १५० स्वॅबची चाचणी व्हायची. सप्टेंबरमध्ये दिवसाला ३०० चाचण्या होऊ लागल्या. यंदा फेब्रुवारीपासून ८०० चाचण्या होऊ लागल्या. आता दिवसाला साडेचार हजार चाचण्यांची वाढ होणार आहे. जिल्हा रुग्णालयात प्रयोगशाळा सुरू होण्याच्या अगोदर नाशिकचे स्वॅब धुळे, औरंगाबाद, पुण्याला तपासणीसाठी जात होते. नाशिकसोबत मालेगावमधील कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत असताना प्रलंबित स्वॅबचे प्रमाण वाढत असताना नाशिकमध्ये कोरोना चाचणी प्रयोगशाळेची गरज भासू लागली. त्या वेळी ‘सकाळ'ने त्यासाठी पाठपुरावा सुरू केला. मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेच्या सरचिटणीस नीलिमाताई पवार यांनी पुढाकार घेत संस्थेच्या डॉ. वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात प्रयोगशाळा सुरू केली. त्यासाठी पालकमंत्री छगन भुजबळांचे सहकार्य लाभले. पुढे संस्थेने प्रयोगशाळेचे बळकटीकरण करत स्वतःची अत्याधुनिक यंत्रसामग्री उभी केली. त्याचवेळी रुग्णालयात कोरोनाग्रस्त रुग्णांवरील इलाजाची व्यवस्था करत कोरोना केअर सेंटर सुरू केले. तसेच जिल्हा रुग्णालयात कोरोनाग्रस्त रुग्णांसाठी मध्यवर्ती ऑक्सिजन प्रणालीच्या ५० खाटा आणि नंतर कुंभमेळा इमारतीमधील शंभर खाटा अशा दीडशे खाटांची ऑक्सिजनसह व्यवस्था झाली. जिल्हाधिकारी सूरज मांढरे, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी सार्वजनिक आरोग्य सेवांच्या बळकटीकरणावर भर दिला. मालेगाव महापालिका क्षेत्रात एम. एस. जी. महाविद्यालय, सहारा रुग्णालयात ऑक्सिजनच्या आणि कोरोना केअर सेंटरच्या एकूण ४०० खाटांची व्यवस्था झाली. शिवाय लोटस रुग्णालय, सिक्स सिग्मा रुग्णालयात डेडीकेटेड कोरोना हेल्थ सेंटर, द्वारकामाई, जीवनमध्ये डेडीकेटेड कोरोना रुग्णालयाची व्यवस्था झाल्याने सामान्य रुग्णालयावरील ताण कमी होण्यास मदत झाली आहे. 

१६२ व्हेटिंलेटर उपलब्ध 
सार्वजनिक आरोग्य सेवांच्या बळकटीकरणाचे गेल्यावर्षी सप्टेंबर-ऑक्टोंबरमध्ये निर्णय घेतले गेलेत. जिल्हा रुग्णालयात ४२, एसएमबीटीमध्ये १५, मालेगावमध्ये २२, तर ग्रामीण भागासाठी ८३ अशी एकूण १६२ व्हेटिंलेटरची सोय झाली आहे. ग्रामीण भागासाठीच्या व्हेटिंलेटरमध्ये कॅन्टोन्मेंटमधील १५, सिन्नरमधील १३, चांदवडमधील १५, नांदगावमधील ५, डांगसौंदाणेमधील ५, अभोणामधील ५, पिंपळगावमधील ४, लासलगावमधील ५, झोडगामधील २, नगरसूलमधील ४, येवल्यातील ५, त्र्यंबकेश्‍वरमधील ५ व्हेन्टीलेटर्सचा समावेश आहे. गेल्यावर्षी १ सप्टेंबरला सिन्नर, नाशिक ग्रामीण असे दोनशे खाटांची कोरोना केअर सेंटरची भर पडली. शिवाय देवळालीत ५०, नांदगावमध्ये ३०, सिन्नरमध्ये खासगी ४० अशा खाटा वाढवण्यात आल्यात. १६ सप्टेंबरला कोरोना केअर सेंटरमध्ये २ हजार, डेडीकेटेड कोरोना हेल्थ सेंटरमध्ये ७५० खाटा झाल्या होत्या. त्याचवेळी देवळालीतील सैन्यदल रुग्णालयात १०० आणि सिन्नरमधील वरच्या मजल्यावर ४० खाटा वाढवण्यात आल्या. ५ ऑक्टोबरला ६ खासगी डेडीकेटेड कोरोना हेल्थ सेंटरला मान्यता देण्यात आली. त्यात सटाणा, पिंपळगाव, विंचूर, खडकमाळेगाव, ओझर, खंबाळेमधील खासगी रुग्णालयाचा समावेश होता. अशा सहा सेंटरमुळे ऑक्सिजन खाटांची संख्या ८५० झाली होती. १० ऑक्टोंबरला नांदगाव आणि एकलहरेमधील रुग्णालयात आणखी ८० ऑक्सिजन खाटांची व्यवस्था झाली. उमराणे ग्रामीण रुग्णालयात ३० आणि अंजनेरीच्या स्पोटर्स कॉम्प्लेक्समध्ये ३० ऑक्सिजन खाटांची व्यवस्था करण्यात येत आहे. मानूरच्या आदिवासी विकासच्या वसतिगृहात ३० ऑक्सिजन खाटांची व्यवस्था झाली आहे. १ मार्च २०२१ ला रुग्णसंख्या वाढ पाहून उपलब्ध आरोग्य व्यवस्थांचा पूर्ण क्षमतेने पुन्हा वापर करण्यास सुरवात करत सार्वजनिक आरोग्य सेवेतील मनुष्यबळ गेल्यावर्षीप्रमाणे कोरोना आपत्तीला तोंड देण्यासाठी कार्यान्वीत करण्यात आले. 

नाशिक शहरातील आरोग्य व्यवस्था 
० रुग्णालय- ८४ 
० उपलब्ध खाटा- ३ हजार ५६७ 
० सर्वसाधारण खाटा- १ हजार ४७६ 
० ऑक्सिजन खाटा- १ हजार २८३ 
० आयसीयू खाटा- ५३७ 
० व्हेटिंलेटर- २५१ 
० कोरोना केअर सेंटर खाटा- ९०० 
० डेडीकेटेड कोरोना हेल्थ सेंटर खाटा- २ हजार १५७ 
० जिल्हा कोरोना रुग्णालय खाटा- ५१०