नाशिक जिल्ह्यातील 28 राज्य संरक्षित स्मारकांना मिळणार खासगी पालक

अंकाई किल्ला

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
राज्याला पुरातत्त्वीय अवशेष, स्मारके, हस्तलिखिते, पारंपरिक कला व इतर सांस्कृतिक परंपरांच्या स्वरूपात समृद्ध असा वारसा आहे. वारशाचे जतन करण्यासाठी पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागामार्फत ‘महाराष्ट्र वैभव राज्य संरक्षित स्मारक संगोपन योजना’ प्रस्तावित केली आहे. त्या अंतर्गत जिल्ह्यातील 28 राज्य संरक्षित स्मारकांना पालक मिळणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्था, खासगी कंपनी, विश्वस्त मंडळ अथवा खासगी व्यक्तींकडे स्मारकाच्या पालकत्वाची जबाबदारी सोपविली जाणार आहे.

महाराष्ट्र प्राचीन स्मारके, पुराण वास्तुशास्त्रविषयक स्थळे व अवशेष अधिनियम 1960 च्या अधिनियमाच्या 15 व्या कलमामध्ये स्मारकाच्या जतन, संवर्धन व सुशोभीकरण आदी कामांमध्ये लोकसहभागाची तरतूद करण्यात आलेली आहे. त्यानुसार जनतेसमोर एखाद्या योजनेच्या स्वरूपात तरतूद केल्यास स्मारकाच्या जतन-दुरुस्ती कार्याला मोठा हातभार लागेल, ही बाब विचारात घेऊन पुरातत्त्व विभागांमार्फत राज्य संरक्षित स्मारके दत्तक दिली जाणार आहेत.

नाशिक जिल्ह्यातील राज्य संरक्षित स्मारकांच्या जतन, देखभाल, सुशोभीकरण आदी कामांसाठी सार्वजनिक व सामाजिक सहभाग मिळविणे, खासगी क्षेत्रातील कौशल्याचा, ज्ञानाचा आणि अनुभवाचा जतन व दुरुस्ती कार्यासाठी उपयोग करून घेण्याच्या उद्देशाने 28 स्मारके खासगी व्यक्तींच्या ताब्यात दिली जाणार आहेत. त्यामध्ये सहा किल्ल्यांसह दोन लेणी, पंधरा मंदिरे तसेच इतर पाच स्मारकांचा समावेश आहे. या योजनेंतर्गत स्मारक घेतल्यानंतर त्याची देखभाल-दुरुस्ती व सुशोभीकरण संबंधित संस्थेला करावे लागणार आहे.

दरम्यान, गौरवपूर्ण वारशाचे जतन आणि संवर्धन करू इच्छिणार्‍या संस्थांना आणि व्यक्तींना या मोहिमेत प्रत्यक्ष सहभागाची संधी देऊन त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी ही योजना कार्यान्वित करण्यात आली. या योजनेमध्ये खासगी कंपनी/विश्वस्त मंडळ/व्यक्तींना त्यांचे ज्ञान, अनुभव, कौशल्य आणि भांडवल गुंतवून राज्य संरक्षित स्मारकांचे जतन करण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आल्याचे पुरातत्त्व विभागाकडून स्पष्ट करण्यात आले.

जिल्ह्यातील या स्मारकांचा होणार समावेश
किल्ले : अंकाई-टंकाई (येवला), गाळणा, मालेगाव (मालेगाव), मुल्हेर, साल्हेर (सटाणा), हतगड (सुरगाणा).
लेणी : अरनाथ जैन लेणी, पार्श्वनाथ जैन लेणी (अंजनेरी).
मंदिरे : इंद्राळेश्वर, त्रिभुवनेश्वर, बल्लाळेश्वर (त्र्यंबकेश्वर), जैन लेणी (कालिका मंदिर), रेणुकादेवी, विष्णू मंदिर, वटेश्वर महादेव (चांदवड), तातोबा मंदिर (ओढा), नीळकंठेश्वर महादेव, सुंदरनारायण (नाशिक), महादेव मंदिर (देवळा-सटाणा), मुक्तेश्वर महादेव (सिन्नर), वैजेश्वर महादेव (वावी), राघवेश्वर महादेव (चिंचोडी-येवला), महादेव मंदिर (देवळी कराड-कळवण).
इतर : स्वातंत्र्यवीर सावरकर जन्मस्थान, सावरकरवाड्यातील विहीर (भगूर), सरकारवाडा (नाशिक), रंगमहाल (चांदवड), कुशावर्त तीर्थ (त्र्यंबकेश्वर).

वैभवशाली स्मारकांचे जतन व पुनरुज्जीवन करून भावी पिढीला आपल्या संस्कृतीची आणि परंपरेची ओळख करून देणे गरजेचे आहे. त्यासाठी पालकत्व योजना सुरू करण्यात आली. धार्मिक स्थळांसह मंदिरांच्या ठिकाणी संबंधित संस्थांना शुल्क आकरता येणार नाही. मात्र, किल्ल्यांसह इतर स्मारकांमध्ये तिकीट शुल्क घेण्याची मुभा संबंधित संस्थांना असेल.
– आरती आळे, सहायक संचालक,
पुरातत्त्व विभाग

हेही वाचा :

The post नाशिक जिल्ह्यातील 28 राज्य संरक्षित स्मारकांना मिळणार खासगी पालक appeared first on पुढारी.