नाशिक : जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना, कॉन्टॅक्ट ट्रेसिंग व संशयित रुग्णांच्या चाचण्या करून घेतल्या जात आहेत. परिणामी जिल्ह्यात चाचण्यांच्या प्रमाणात लक्षणीय वाढ झाली आहे. रोज सरासरी दहा हजार याप्रमाणे गेल्या दहा दिवसांत एक लाख चाचण्या करण्यात आल्या. यातून जिल्ह्यातील चाचण्यांच्या संख्येने सात लाखांचा टप्पा ओलांडला असून, रविवार (ता. २८)पर्यंत सात लाख नऊ हजार २७५ चाचण्या झालेल्या आहेत. शेवटच्या एक लाखाच्या टप्प्यातील चाचण्यांत ३० हजार ९४८ पॉझिटिव्ह आढळले असून, पॉझिटिव्हिटी रेट २९ टक्क्यांच्या सुमारास राहिला आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने मध्यंतरीच्या काळात चाचण्यांचा वेगही मंदावला होता. चार लाख चाचण्यांपासून पाच लाख चाचण्यांचा टप्पा गाठण्यासाठी ५१ दिवसांचा कालावधी लागला; परंतु फेब्रुवारी मध्यानंतर कोरोनाबाधितांच्या संख्येत लक्षणीय वाढ होत असताना चाचण्यांची संख्यादेखील वाढविली आहे. दहा दिवसांपूर्वी गेल्या १८ मार्चला जिल्ह्यातील चाचण्यांच्या संख्येने सहा लाखांचा टप्पा गाठला होता. यानंतर चाचण्यांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली असून, रोज सरासरी दहा हजार चाचण्या जिल्हा पातळीवर करण्यात आल्या आहेत. यातून दहा दिवसांतच जिल्ह्यातील चाचण्यांच्या संख्येने सात लाखांचा टप्पा ओलांडला आहे. दरम्यान, सहा लाखांहून सात लाख चाचण्या होत असताना या अंतिम एक लाख चाचण्यांमध्ये आढळलेल्या पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या सर्वाधिक आहे. या टप्प्यात ३० हजार ९४८ रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत, तर या कालावधीत १८ हजार २२१ रुग्णांनी कोरोनावर मात केली. १२९ बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
हेही वाचा > भुजबळांची बिअर बारमध्ये धाड! बिल न देताच मद्यपींचा पोबारा; दिवसभर चर्चेला उधाण
पाच लाख ३२ हजार ३०८ निगेटिव्ह
सात लाख चाचण्या पूर्ण झालेल्या असताना यापैकी एक लाख ७१ हजार ८३५ रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत, तर पाच लाख ३२ हजार ३०८ रुग्णांचे अहवाल निगेटिव्ह आले. रविवारी सायंकाळी उशिरापर्यंत पाच हजार १३२ रुग्णांचे अहवाल प्रलंबित होते. आतापर्यंत चाचण्यांमध्ये कोरोना रुग्ण आढळण्याचा अर्थात पॉझिटिव्हिटी रेट २४.२३ टक्के राहिला आहे.
चाचण्यांच्या संख्येचे महत्त्वाचे टप्पे असे
एक लाख चाचण्या------------१७ ऑगस्ट २०२०
दोन लाख चाचण्या------------१५ सप्टेंबर २०२०
तीन लाख चाचण्या------------१२ ऑक्टोबर २०२०
चार लाख चाचण्या------------११ डिसेंबर २०२०
पाच लाख चाचण्या-------------१ फेब्रुवारी २०२१
सहा लाख चाचण्या-----------१८ मार्च २०२१
सात लाख चाचण्या-----------२८ मार्च २०२१
हेही वाचा > दुसऱ्या लाटेत कोरोनाने बालकांना घेरले! हृदय, मेंदूवर आघात होत असल्याची बाब उघड