नाशिक : जिल्ह्यात आजपासून मतदार पुनरीक्षण मोहीम

Voting Finger www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

जिल्ह्यातील १५ ही विधानसभा मतदारसंघांत बुधवारपासून (दि.९) मतदारयादी संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शनानुसार 1 जानेवारी 2023 या अर्हता दिनांकावर आधारित छायाचित्रांसह हा विशेष कार्यक्रम घेण्यात येणार आहे. मतदारयादीतील नोंदी तपासून मतदारांनी या मोहिमेला सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांनी केले आहे. ५ जानेवारी २०२३ ला अंतिम मतदारयादीची प्रसिद्धी करण्यात येईल.

विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत 9 नोव्हेंबर ते 8 डिसेंबर या कालावधीत प्रारूप मतदारयादीबाबत असलेले दावे व हरकती स्वीकारण्यात येणार आहेत. मतदारांसाठी https://ceo.maharashtra.gov.in किंवा https://electoralsearch.in या संकेतस्थळावर प्रारूप मतदारयाद्या उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार 1 जानेवारी, 1 एप्रिल, 1 जुलै व 1 ऑक्टोबर 2023 या अर्हता दिनांकावर आधारित विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम राबविला जात आहे. त्यानुसार जर पात्र मतदार 2023 या वर्षातील जानेवारी, एप्रिल, जुलै व ऑक्टोबर या महिन्याच्या 1 तारखेला किंवा त्या आधी वयाची 18 वर्षे पूर्ण करीत असतील अशा मतदारांना 9 नोव्हेंबर राेजी सुरू होणाऱ्या विशेष कार्यक्रमांतर्गत अर्ज क्रमांक 6 भरून आगाऊ मतदार नोंदणी करता येणार आहे.

प्रारूप मतदारयादी प्रसिद्ध झाल्यानंतर त्यातील नोंदी तपासून नमुना-7 भरून मतदारयादीतील मयत व दुबार मतदारांची नावे वगळता येणार आहेत. नमुना-8 नुसार मतदारयादीतील दुरुस्ती किंवा पत्त्यात बदल करता येणार आहेत. आयोगामार्फत मतदारयादी आधारशी संलग्न करण्याची मोहीमदेखील सुरू असून, मतदारांना त्यांचे आधार मतदारयादीशी जोडता येईल, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

नवमतदारांवर लक्ष…

जिल्ह्यात एकूण 45 लाख 93 हजार 823 मतदार आहेत. त्यामध्ये 24 लाख 2 हजार 872 पुरुष मतदार, तर 21 लाख 90 हजार 874 स्त्रिया मतदार आहेत. 77 तृतीयपंथी मतदार असून, निरंतर प्रक्रियेमध्ये दुबार, मयत व स्थलांतरित झालेल्या 1 लाख 664 मतदारांची नावे यादीतून वगळण्यात आले आहे. विशेष मोहिमेत नवमतदार व महिला मतदार यांच्या नावनोंदणीसाठी विशेष लक्ष देण्यात येईल, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

येथे करता येणार नावनोंदणी….

* व्होटर हेल्पलाइन मोबाइल ॲप

* नॅशनल व्होटर सर्व्हिस पोर्टल (www.nvsp.in)

* संबंधित मतदार नोंदणी कार्यालय किंवा बीएलओ

विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम…

* प्रारूप मतदारयादी प्रसिद्धी : ९ नोव्हेंबर

* दावे व हरकतींचा कालावधी : 8 डिसेंबरपर्यंत

* दावे व हरकती निकाली काढणे : 26 डिसेंबरपर्यंत

* अंतिम मतदारयादी प्रसिद्धी : 5 जानेवारी 2023

नोंदणीसाठी विशेष शिबिरांचे आयोजन…

* ग्रामसभा : मतदारयादी वाचन व नोंदणी १० नोव्हेंबर

* चार विशेष शिबिरे : १९ व २० नाव्हेंबर, ३ आणि ४ डिसेंबर

* विद्यार्थी, दिव्यांग, महिलांसाठी शिबिरे : १२ व १३ नोव्हेंबर

* तृतीयपंथी, देहविक्री करणाऱ्या महिला, भटक्या व विमुक्त जमातीसाठी शिबिरे : २६ आणि २७ नोव्हेंबर.

हेही वाचा:

The post नाशिक : जिल्ह्यात आजपासून मतदार पुनरीक्षण मोहीम appeared first on पुढारी.