नाशिक जिल्ह्यात आणखी तीन दिवस अतिवृष्टी ; हवामान पूर्वानुमान विभागाचा इशारा

Rain update:

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

उत्तर- मध्य महाराष्ट्रातील नाशिक व पुणे जिल्हयात पुढील तीन दिवस (१२ ते १४ जुलै) अतिवृष्टीचा इशारा हवामान पूर्वानुमान विभागाने दिला आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार या जिल्ह्यांमधील घाटमाथा परिसरात अतिवृष्टी होणार असल्याने जिल्हयातील नद्यांना महापूर येण्याची शक्यता आहे.

राज्यात आठवडाभरापासून अतिवृष्टी सुरू आहे. यामुळे कोकण, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, विदर्भ आदी भागातील सर्व नद्यांना पूर आले असून धरणांच्या साठ्यामध्येही वाढ झाली आहे. यामुळे मोठ्या शहरांमध्ये जूनमध्ये जूनमध्ये लागू केलेली पाणी कपातही मागे घेण्यात आली असून धरणांमधून सोडलेल्या विसर्गामुळे राज्यातील सर्व प्रमुख नद्यांना पूर आले आहेत. नाशिक जिल्ह्यातही शु्क्रवार (दि.८) पासून जोरदार पावसाला सुरवात झाली असून जिल्हयाच्या पश्चिम भागात जोरदार अतिवृष्टीमुळे जनजीवन विस्कळित झाले आहे. जिल्हयातील प्रमुख गोदावरी, दारणा, कादवा, गिरणा, मोसम या नद्यांना पूर आले असून दारणा, गंगापूर, पालखेड या प्रमुख धरणांमधून विसर्ग सोडण्यात येत आहे. यामुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे. याचवेळी हवामान पूर्वानुमान विभागाने १२ ते १४ जुलै या तीन दिवस नाशिक व पुणे जिल्ह्यातील घाटमाथा परिसरात अतिवृ्ष्टीची शक्यता वर्तवली आहे. उत्तर महाराष्ट्रातील धुळे, जळगाव, नंदूरबार व नगर या जिल्ह्यांमध्येही काही ठिकाणी अतिवृष्टीचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

महापूर येणार?

हवामान पूर्वानुमान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार १२ ते १४ जुलै दरम्यान नाशिक जिल्ह्यात प्रामुख्याने घाटमाथा परिसरात अतिवृ्ष्टी झाल्यास दारणा, गोदावरी, कादवा व गिरणा या नद्यांना महापूर येण्याची शक्यता व्यक्त होत आहे. जिल्हा आपत्ती निवारण कक्षाकडूनही या इशाऱ्याच्या पार्श्वभूमिवर तयारी करण्यात आली आहे. गोदावरी व दारणेला पूर आल्यास निफाड तालुक्यातील चांदोरी, सायखेडा तसेच नाशिक शहरात पंचवटी परिसरातील जनजीवनावर त्याचा विपरित परिणाम होत असतो. त्यामुळे हवामान विभागाच्या इशाऱ्यानुसार आपत्ती निवारण कक्षाकडून पूर्वतयारी सुरू आहे.

हेही वाचा :

The post नाशिक जिल्ह्यात आणखी तीन दिवस अतिवृष्टी ; हवामान पूर्वानुमान विभागाचा इशारा appeared first on पुढारी.