नाशिक जिल्ह्यात ‘इतक्या’ लाख शिधापत्रिकाधारकांना ‘आनंदाचा शिधा’

आनंदाचा शिधा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

मराठी नूतन वर्षारंभ अर्थात गुढीपाडवा आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त शिधापत्रिकाधारकांना १०० रुपयांत आनंदाचा शिधा देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य शासनाने घेतले आहे. नाशिक जिल्ह्यातील ७ लाख ९३ हजार ५९१ अंतोदय व प्राधान्य शिधापत्रिकाधारक कुटुंबांना त्याचा फायदा होणार आहे.

राज्य मंत्रिमंडळाच्या बुधवारी (दि.२२) झालेल्या बैठकीत १०० रुपयांत प्रत्येकी एक किलो रवा, चणाडाळ, साखर व एक लिटर पामतेल अशा जिन्नस असलेला आनंदाचा शिधा १०० रुपयांत उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला. यापूर्वी दिवाळीतही शासनाने अशाच पद्धतीने शिधापत्रिकाधारकांना शिधा वितरित केला होता. परंतु, दिवाळीचा अनुभव गाठीशी असल्याने शासनाने ई-पॉसची व्यवस्था नसलेल्या ठिकाणी ऑफलाइन पद्धतीने आनंदाचा शिधा वितरणाचे निर्देश दिले आहेत. शासनाच्या या निर्णयामुळे राज्यातील १ कोटी ६३ लाख शिधापत्रिकाधारकांची गुढीपाडवा आणि डॉ. आंबेडकर जयंतीचा सण आनंदी हाेणार आहेे.

नाशिक जिल्ह्यात शिधापत्रिकांची संख्या ७ लाख ९३ हजार ५९१ इतकी आहे. त्यामध्ये १ लाख ७८ हजार अंतोदय कार्डधारक लाभार्थी आहेत. उर्वरित ६ लाख १५ हजार ५९१ प्राधान्य रेशनकार्डधारक आहेत. या सर्व रेशनकार्डधारक लाभार्थी कुटुंबांना या निर्णयामुळे १०० रुपयांमध्ये चार जिन्नस असलेला शिधा उपलब्ध होईल.

पंधरवड्यात निविदा

आनंदाचा शिध्यासाठी आवश्यक जिन्नसांच्या खरेदीकरिता महाटेंडर्स या ऑनलाइन पोर्टलद्वारे २१ दिवसांऐवजी १५ दिवसांच्या कालावधीत निविदा प्रक्रिया राबविण्यत येईल. २०२२ मध्ये दिवाळी सणानिमित्त शिधाजिन्नस खरेदीसाठी निविदा प्रक्रियेत २७९ प्रतिसंच या दरानुसार ४५५ कोटी ९४ लाख आणि इतर आनुषंगिक खर्चासाठी १७ कोटी ६४ लाख अशा ४७३ कोटी ५८ लाख इतक्या खर्चास कॅबिनेटमध्ये मान्यता देण्यात आली.

शासनाच्या निर्णयाचे स्वागत करतो. दिवाळीत शिधा वितरणावेळी प्रत्येक संचामागे ६ रुपये कमिशन रेशन दुकानदारांना देण्यात आले. त्यामध्ये यंदा वाढ करून मिळावी. रेशन दुकानांमध्ये वेळेत शिध्याचे संच पोहोचतील अशा पद्धतीने नियोजन करावे. जेणेकरून दुकानदार व लाभार्थी यांच्यात वादाचे प्रकार उद‌्भवणार नाही.

– निवृती कापसे, जिल्हाध्यक्ष, रास्तभाव दुकानदार संघटना, नाशिक

जिल्हा दृष्टिक्षेपात

एकूण कार्डधारक : ७ लाख ९३ हजार ५९१

अंतादेय कार्डधारक : १ लाख ७८ हजार

प्राधान्य कार्डधारक : ६ लाख १५ हजार

हेही वाचा :

The post नाशिक जिल्ह्यात 'इतक्या' लाख शिधापत्रिकाधारकांना 'आनंदाचा शिधा' appeared first on पुढारी.