नाशिक जिल्ह्यात उष्णतेची लाट ; मनमाड @ 42

जळगाव : पारा

नाशिक (मनमाड) : पुढारी वृत्तसेवा
शहर, परिसरासह ग्रामीण भागामध्ये तापमानात वाढ सुरूच असून रविवारी (दि. 14) पारा 42 अंशांवर गेल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. उष्णतेच्या लाटेमुळे रविवारच्या आठवडे बाजारात शुकशुकाट होता.

शहरात दर रविवारी भगतसिंग मैदान, शिवाजी चौक, कॉलेज रोड, ईदगाह परिसर, जैन मंदिर परिसर या भागात रविवारी आठवडे बाजार भरतो. त्यात शहरातील नागरिकांसोबत परिसरातील शेतकरी विक्रीसाठी भाजीपाला, धान्य आदी वस्तू घेऊन येतात. तर इतर दुकानदार व व्यासायिक आपापली दुकाने थाटतात. आठवडे बाजारात लाखो रुपयांची उलढाल होते. परंतु शहर, परिसरात उष्णतेची लाट आली असून, सूर्य आग ओकत असल्याने तापमानात मोठी वाढ होऊन पारा 42 अंशांवर गेल्याने नागरिकांनी घराबाहेर पडणे टाळले. उष्णतेची लाट आली असून बहुतांश ठिकाणी तापमान चाळीशीपार गेले आहे. त्यातच पुढील काही दिवसांमध्ये पारा आणखी वाढणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. राज्यातील तापमानाचा पारा सोमवारी दोन ते तीन अंश सेल्सिअसने वाढला आहे. आर्द्रतायुक्त आणि गरम हवेमुळे व उष्णतेमुळे अस्वस्थता जाणवणार असल्याची माहिती ज्येष्ठ हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी दिली आहे. हवामान विभागाच्या म्हणण्यानुसार, देशातील बहुतांश भागात 40 अंशांपेक्षा जास्त तापमानाची नोंद झाली आहे. जळगाव जिल्ह्यात 44.8 अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले आहे. अकोला येथेही पारा 44 अंशाच्या पुढे गेला असून धुळे, परभणी, वर्धा येथे तापमान 43 अंशांपेक्षा अधिक असल्याचे दिसून आले.

उन्हाच्या झळांनी फळबागा करपल्या
मार्च आणि एप्रिल महिन्यांत वादळी पावसाने तडाखा दिल्यानंतर मे महिन्यात उन्हाच्या झळा वाढत आहेत. वाढत्या उष्म्यामुळे बाष्पीभवनाचा वेग वाढून जमिनीतील ओलावा कमी झाल्यामुळे उन्हाळी पिकांना पाण्याचा तुटवडा भासत आहे. पिकांची पाने करपत असून, केळी, संत्री, मोसंबीसह फळांनाही चटका बसत आहे.

हेही वाचा:

The post नाशिक जिल्ह्यात उष्णतेची लाट ; मनमाड @ 42 appeared first on पुढारी.