नाशिक जिल्ह्यात कोरोनाचा पुन्हा भडका! दिवसभरात सहाशेहून अधिक पॉझिटिव्‍ह 

नाशिक : कोरोनाचा जिल्‍ह्‍यात प्रादुर्भाव वाढत असून, त्‍यातही नाशिक महापालिका हद्दीतील क्षेत्र या फैलावाचे केंद्र ठरत असल्‍याची स्‍थिती आहे. तब्‍बल १३३ दिवसांनंतर जिल्‍ह्‍यात दर दिवशी आढळणाऱ्या कोरोना बाधितांच्‍या संख्येने सहाशेचा आकडा ओलांडला.

गुरुवारी (ता.२५) दिवसभरात ६०१ अहवाल पॉझिटिव्‍ह आले आहेत. बरे झालेल्‍या रुणांची संख्या २९१ राहिली. तिघा बाधितांचा जिल्‍ह्‍यात मृत्‍यू झाला. यातून ॲक्‍टिव्‍ह रुग्‍णसंख्येत ३०७ ने वाढ झाली असून, सद्यःस्‍थितीत उपचार घेणार्या कोरोना बाधितांची संख्या २ हजार ४६९ वर पोहोचली आहे. 

नाशिक शहरातील ३६६

यापूर्वी गेल्‍या १५ ऑक्‍टोबरला दिवसभरात ६९७ कोरोना बाधित आढळले होते. त्‍यानंतर हा आकडा खालावला होता. नोव्‍हेंबरमध्ये सरासरी अडीचशे रुग्‍ण दर दिवशी आढळत होते. डिसेंबर व जानेवारी महिन्‍यात सरासरी दीडशे ते दोनशे रुग्‍ण दिवसाला आढळत होते. फेब्रुवारीचे पहिले पंधरा दिवसदेखील चिंताजनक नव्‍हते. परंतु गेल्‍या काही दिवसांपासून नव्‍याने आढळणार्या कोरोना बाधितांचा आलेख वाढत आहे. दरम्‍यान गुरुवारी (ता.२५) आढळलेल्‍या कोरोना बाधितांमध्ये नाशिक शहरातील तब्‍बल ३६६ रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्‍ह आले आहेत.

हेही वाचा - अवघ्या चारच दिवसांवर बहिणीचं लग्न अन् लग्नघरातूनच निघाली अंत्ययात्रा; दुर्दैवी घटना

बाधितांची संख्या १ लाख २१ हजार ४७८ वर

नाशिक ग्रामीणमधील १६२ कोरोना बाधित आढळले. मालेगावलाही पुन्‍हा एकदा कोरोनाचा फैलाव होऊ लागला असून या क्षेत्रातून ५३ रुग्‍णांचे अहवाल पॉझिटिव्‍ह आले असून, जिल्‍हा बाहेरील २० कोरोना बाधित दिवसभरात आढळले. बरे झालेल्‍या रुग्‍णांमध्ये नाशिक शहरातील १४६, नाशिक ग्रामीणमधील १०९, मालेगावच्‍या ३१ तर जिल्‍हाबाहेरील पाच रुग्‍णांनी कोरोनावर यशस्‍वीरीत्‍या मात केली आहे. तीन जणांचा उपचारादरम्‍यान मृत्‍यू झाला असून, यापैकी प्रत्‍येकी एक नाशिक शहर, मालेगाव शहर आणि नाशिक ग्रामीण भागातील आहे. दिवसभरात जिल्‍ह्‍यातील रुग्‍णालये व गृहविलगीकरणात १ हजार ४२१ रुग्‍ण आढळले आहेत. यापैकी नाशिक महापालिका क्षेत्रातील रुग्‍णालये व गृहविलगीकरणात १ हजार ३९९ रुग्‍ण, जिल्‍हा रुग्‍णालयात चार रुग्‍ण दाखल झाले आहेत. सायंकाळी उशीरापर्यंत ८०७ रुग्‍णांना अहवालाची प्रतिक्षा होती. दरम्‍यान जिल्‍ह्‍यातील एकूण कोरोना बाधितांची संख्या १ लाख २१ हजार ४७८ वर पोहोचली असून, यापैकी १ लाख १६ हजार ९१४ रुग्‍णांनी कोरोनावर यशस्‍वीरीत्‍या मात केली आहे. आतापर्यंत २ हजार ०९५ बाधितांचा उपचारादरम्‍यान मृत्‍यू झाला आहे. 

हेही वाचा - ५० फूट खोल विहीर, आत ७३ वर्षांच्या आजी; दैवच बलवत्तर दुसरे काय!