नाशिक जिल्ह्यात कोरोनाचे आठ बळी; दिवसभरात १८१ पॉझिटिव्‍ह 

नाशिक : जिल्ह्या‍त कोरोनामुळे होणाऱ्या मृतांची संख्या वाढत आहे. मंगळवारी (ता. १५) दिवसभरात आठ रुग्‍णांचा उपचारादरम्‍यान मृत्‍यू झाला. १८१ रुग्‍णांचा अहवाल पॉझिटिव्‍ह आलेला असताना २४० रुग्‍णांची कोरोनावर यशस्‍वीरीत्‍या मात केली. यातून ॲक्‍टिव्‍ह रुग्‍णसंख्येत ६७ ने घट झाली असून, तीन हजार ४०० बाधितांवर जिल्ह्या‍त सध्या उपचार सुरू आहेत. 

मंगळवारी आढळलेल्‍या कोरोनाबाधितांमध्ये नाशिक शहरातील १२५, नाशिक ग्रामीणमधील ५२, मालेगाव व जिल्ह्याबाहेरील प्रत्‍येकी दोन रुग्‍णांचे अहवाल पॉझिटिव्‍ह आले आहेत. बरे झालेल्‍या रुग्‍णांमध्ये नाशिक शहरातील ९३, नाशिक ग्रामीणमधील १४३, तर जिल्ह्याबाहेरील चार रुग्‍णांनी कोरोनावर यशस्‍वीरीत्‍या मात केली आहे. आठ मृत्‍यूंमध्ये नाशिक शहरातील चार, तर ग्रामीणमधील चार रुग्‍णांचा समावेश आहे. शहरातील कामटवाडा येथील ५० वर्षीय पुरुष, आडगाव येथील ६० वर्षीय पुरुष, पंचवटीतील ५४ वर्षीय पुरुष, म्‍हसरूळ-मखमलाबाद लिंक रोडवरील ५४ वर्षीय पुरुष रुग्‍णाचा मृत्‍यू झाला.

हेही वाचा>> दुर्दैवी! आई घरात येण्यापूर्वीच सातवीत शिकणाऱ्या 'प्रज्योत'चा खेळ संपला; मातेने फोडला हंबरडा

संख्या एक लाख पाच हजार ७५३  

यातून एकूण कोरोनाबाधितांची संख्या एक लाख पाच हजार ७५३ इतकी झाली असून, यांपैकी एक लाख ४७८ रुग्‍णांनी कोरोनावर यशस्‍वीरीत्‍या मात केली आहे. आतापर्यंत एक हजार ८७५ रुग्‍णांचा मृत्‍यू कोरोनामुळे झाला आहे. दिवसभरात दाखल रुग्‍णांमध्ये नाशिक महापालिका हद्दीतील रुग्‍णालये व गृहविलगीकरणात ६९१, नाशिक ग्रामीण रुग्‍णालये व गृहविलगीकरणात ६१, मालेगाव महापालिका हद्दीतील रुग्‍णालये व गृहविलगीकरणात ११, डॉ. वसंत पवार वैद्यकीय महाविद्यालयात पाच, जिल्‍हा रुग्‍णालयात दोन रुग्‍ण दाखल झाले आहेत. सायंकाळी उशिरापर्यंत एक हजार २७८ रुग्‍णांचे अहवाल प्रलंबित होते. यांपैकी सर्वाधिक ६५० अहवाल नाशिक शहरातील रुग्‍णांचे आहेत. ४५१ अहवाल नाशिक ग्रामीणचे असून, मालेगावच्‍या १७७ रुग्‍णांना अहवालाची प्रतीक्षा होती. 

हेही वाचा>> अवघ्या पंचक्रोशीचे काळीज हेलावले! जेव्हा लष्करी अधिकारी 'तिरंगा' वीरपत्नी धारित्रींना सुपूर्द करतात तेव्हा...