नाशिक : गेल्या अनेक दिवसांनंतर जिल्ह्यात दिवसभरातील कोरोना बाधितांच्या तुलनेत बरे झालेल्या रुग्णांची संख्या अधिक राहिली. यातून ॲक्टिव्ह रुग्णांच्या संख्येत किरकोळ प्रमाणात घट झाली आहे. मंगळवारी (ता.२४) दिवसभरात १३२ कोरोना बाधित आढळून आले असून, कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या १८१ होती. तीन रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. यातून ॲक्टीव्ह रुग्ण संख्येत ५२ ने घट झाली असून, सद्यःस्थितीत २ हजार ६६० बाधितांवर जिल्ह्यायात उपचार सुरू आहेत.
मंगळवारी आढळलेल्या कोरोना बाधितांमध्ये नाशिक शहरातील ९९, नाशिक ग्रामीण भागातील ३१, जिल्हाबाहेरील दोन रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. कोरोनावर मात केलेल्या रुग्णांमध्ये नाशिक शहरातील १३१, नाशिक ग्रामीणमधील ४५, जिल्हाबाहेरील पाच रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तीन मृतांमध्ये नाशिक शहरातील एक तर नाशिक ग्रामीण भागातील दोन रुग्णांचा समावेश आहे. नाशिक ग्रामीणमध्ये भगूर येथील ७६ वर्षीय पुरुष आणि दापूर (ता.सिन्नर) येथील ५२ वर्षीय पुरुष रुग्णाचा मृत्यू झाला आहे. शहरात जयभवानी रोडवरील ४५ वर्षीय पुरुष रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची नोंद आहे.
हेही वाचा - क्रूर नियती! नातेवाईकांसोबत गणेशचे ते फोटो सेशन ठरले शेवटचे; घटनेने परिसरात हळहळ
जिल्ह्यातील एकूण कोरोना बाधितांची संख्या ९९ हजार ८६ झाली असून, यापैकी ९४ हजार ६५७ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. आत्तापर्यंत जिल्ह्यात १ हजार ७६९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दिवसभरात दाखल रुग्णांमध्ये नाशिक महापालिका हद्दीतील रुग्णालये व गृहविलगीकरणात ६८८, नाशिक ग्रामीण रुग्णालये व गृहविलगीकरणात ५४, मालेगाव महापालिका हद्दीतील रुग्णालयांत सात, डॉ. वसंत पवार वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात पाच तर जिल्हा रुग्णालयात तीन रुग्ण दाखल झाले आहेत. सायंकाळी उशिरापर्यंत २ हजार ६७४ अहवाल प्रलंबित होते. यापैकी नाशिक शहरातील १ हजार ७४६, नाशिक ग्रामीणमधील ७१४, मालेगाव येथील २१४ रुग्णांचे अहवाल प्रलंबित आहेत.
हेही वाचा - खेळ कुणाला दैवाचा कळला! लेकराचं तोंड बघायच्या आधीच वडिल देवाला प्रिय; गावात भयाण शांतता
मालेगावमध्ये असाही झिरो
मंगळवारी जिल्हा रूग्णालयातर्फे जारी आकडेवाडीनुसार मालेगाव महापालिका हद्दीत दिवसभरात एकही कोरोना बाधित आढळून आला नाही. कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या आणि या परीसरात मृत्यूदेखील शून्य राहिले. आत्तापर्यंत मालेगावला ४ हजार २७२ कोरोना बाधित आढळले असून, यापैकी ४ हजार ००७ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. १७१ रुग्णांचा आत्तापर्यंत मृत्यू झाला असून, सद्य स्थितीत ९४ बाधितांवर उपचार सुरू आहेत.