नाशिक जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक! आत्तापर्यंतची दिवसभरातील विक्रमी रुग्णसंख्या

नाशिक : जिल्‍ह्‍यात कोरोनाच्‍या प्रादुर्भावामुळे परीस्‍थिती चिंताजनक होत चालली आहे. बुधवारी (ता.१७) दिवसभरात २ हजार १४६ कोरोना बाधित आढळले असून, आत्तापर्यंत एका दिवसभरात आढळलेल्‍या कोरोना बाधितांची ही सर्वाधिक संख्या आहे. त्‍यामूळे कोरोना बाधित आढळल्‍याचे यापूर्वीचे सर्व विक्रम मोडीस निघाले आहेत. दरम्‍यान दिवसभरात नऊ बाधितांचा जिल्‍ह्‍यात मृत्‍यू झाला आहे. ॲक्‍टिव्‍ह रुग्‍ण संख्येत १ हजार ४४० ने वाढ झाली असून, सध्यःस्‍थितीत जिल्‍ह्‍यात उपचार घेणाऱ्या कोरोना बाधितांची संख्या १० हजार ८५१ वर पोहोचली आहे. 

गेल्‍या २९ मार्चला जिल्‍ह्‍यात कोरोनाचा पहिला बाधित रुग्‍ण आढळला होता. यानंतर जुन, जुलै व ऑगस्‍ट महिन्‍यात दर दिवशी आढळणाऱ्या कोरोना बाधितांच्‍या संख्येचा आलेख वाढत चालला होता. १६ सप्‍टेंबरला सर्वाधिक २ हजार ०४८ कोरोना बाधित आढळले होते. त्‍यानंतर दर दिवशी आढळणाऱ्या कोरोना बाधितांच्‍या संख्येत घट होत गेली. सातत्‍याने आकडा खालावत चालला होता. परंतु गेल्‍या काही दिवसांपासून दर दिवशी आढळणाऱ्या कोरोना बाधितांच्‍या संख्येत मोठी वाढ होत गेली. यापूर्वीचे सर्वच विक्रम मोडीत काढतांना बुधवारी (ता.१७) तब्‍बल २ हजार १४६ कोरोना बाधित आढळले. या बाधितांमध्ये नाशिक शहरातील सर्वाधिक १ हजार २९६ बाधित असून, त्‍यापाठोपाठ नाशिक ग्रामीणमध्ये ६३१, मालेगाव महापालिका हद्दीतील १७४, जिल्‍हा बाहेरील ४५ पॉझिटिव्‍ह आढळले आहेत. बरे झालेल्‍या रुग्‍णांमध्ये नाशिक शहरातील साडे तीनशे, नाशिक ग्रामीणमधील २१४, मालेगावचे ९९, जिल्‍हा बाहेरील ३४ रुग्‍णांनी कोरोनावर यशस्‍वीरीत्‍या मात केली आहे. 

नऊ बाधितांचा मृत्‍यू, दोघे चाळीशीच्‍या आतील 

जिल्‍ह्‍यात दिवसभरात कोरोनामुळे नऊ बाधितांचा मृत्‍यू झाला आहे. यात नाशिक ग्रामीणमधील चौघांचा समावेश आहे. यात मालेगाव ग्रामीणमधील ३६ वर्षीय पुरुष, कळवणमधील ७२ वर्षीय, वडनेरभैरव (ता.चांदवड) येथील ६६ वर्षीय पुरुष, दिंडोरीतील ७५ वर्षीय पुरुष बाधिताचा मृत्‍यू झाला आहे. नाशिक शहरातील जेलरोड येथील ३८ वर्षीय महिला, ८३ वर्षीय पुरुष आणि जुने नाशिक भागातील ७५ वर्षीय पुरुष बाधिताचा मृत्‍यू झाला आहे. मालेगाव कॅम्‍प येथील ५० वर्षीय महिलेचा मृत्‍यू झाला असून, कलामपूर (ता.श्रीरामपुर, जि.नगर) येथील व सध्या नाशिकला उपचार घेत असलेल्‍या ७५ वर्षीय पुरुष बाधिताचा मृत्‍यू झाला आहे. 

हेही वाचा - सटाण्यात लहान मुले सातच्या आत घरात! रात्रीच्या विचित्र प्रकाराने दहशत; युवकांचा जागता पहारा

तीन हजार अहवाल प्रलंबित, आढळले तेवीसशे संशयित 

सायंकाळी उशीरापर्यंत जिल्‍ह्‍यातील २ हजार ९६९ संशयित रुग्‍णांचे अहवाल प्रलंबित होते. यापैकी ८०२ नाशिक शहरातील, १ हजार ५७७ रुग्‍ण नाशिक ग्रामीणमधील तर ५९० अहवाल मालेगाव येथील प्रलंबित आहेत. जिल्‍हाभरातील रुग्‍णालये व गृहविलगीकरणात २ हजार ३०३ संशयित दाखल झाले आहेत. यापैकी नाशिक महापालिका हद्दीतील २ हजार १८३ संशयितांचा समावेश आहे. जिल्‍हा रुग्‍णालय व डॉ.वसंत पवार वैद्यकीय महाविद्यालयात प्रत्‍येकी नऊ रुग्‍ण दाखल झाले. 

हेही वाचा - रूम नंबर १०५ चे गुढ कायम; मुंबई-नाशिक हायवेवरील हॉटेलमधील घटना