नाशिक : जिल्ह्यात कोरोनाचा विळखा अधिकाधिक घट्ट होत चालला असून, रुग्णसंख्या वाढीचे रोज नवे उच्चांक गाठले जात आहेत. शनिवारी (ता. २७) जिल्ह्यात तब्बल चार हजार ९१८ रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. ही एका दिवसातील आत्तापर्यंतची सर्वाधिक वाढ आहे. चिंताजनक बाब म्हणजे, मृतांच्या संख्येतही वाढ होत असून, दिवसभरात पंचवीस बाधितांचा मृत्यू झाला आहे. उपचार घेणाऱ्या ॲक्टिव्ह रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत चालली असून, ही संख्या पंचवीस हजारांच्या उंबरठ्यावर पोचली आहे. सद्यःस्थितीत जिल्ह्यात २४ हजार २५० बाधितांवर उपचार सुरू आहेत.
सामान्यतः दररोज आढळणाऱ्या कोरोनाबाधितांमध्ये नाशिक शहरातील रुग्णसंख्या सर्वाधिक राहत होती. परंतु शनिवारी नाशिक ग्रामीणमधील सर्वाधिक दोन हजार ४९८ रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. नाशिक शहरातील दोन हजार १८१, मालेगावमधील १८५, तर जिल्हाबाहेरील ५४ रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. एकीकडे नाशिक ग्रामीण भागात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना कोरोनाच्या बळींच्या संख्येतही वाढ होत आहे. दिवसभरात झालेल्या पंचवीस मृत्यूंपैकी सर्वाधिक बारा मृत नाशिक ग्रामीण भागातील आहेत. शहरातील आठ, मालेगावचे चार, तर जिल्हाबाहेरील धुळे येथील एका बाधिताचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. नाशिक ग्रामीणमध्ये निफाड तालुक्यातील चार, देवळा व सटाणा तालुक्यातील प्रत्येकी दोन, तर इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, नांदगाव, चांदवड तालुक्यांतून प्रत्येकी एका बाधिताचा मृत्यू झाला आहे. पंचवीसपैकी पंधरा मृत हे ज्येष्ठ नागरिक आहेत. सटाण्यातील ३७ वर्षीय युवकाचाही कोरोनामुळे बळी गेल्याची नोंद आहे.
हेही वाचा - सख्ख्या भावांची एकत्रच अंत्ययात्रा पाहण्याचे आई-बापाचे दुर्देवी नशिब; संपूर्ण गाव सुन्न
पाच हजार ९१९ अहवाल प्रलंबित, तीन हजार २२५ रुग्ण दाखल
प्रलंबित अहवालांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. शनिवारी सायंकाळी उशिरापर्यंत पाच हजार ९१९ रुग्णांचे अहवाल प्रलंबित होते. यापैकी सर्वाधिक तीन हजार ६७, नाशिक शहरातील एक हजार ८५६ शहरातील, तर मालेगावच्या ९९६ रुग्णांना अहवालाची प्रतीक्षा होती. जिल्हाभरातील रुग्णालये व गृहविलगीकरणात तीन हजार २२५ संशयित दाखल झाले आहेत. यापैकी तीन हजार २३ रुग्ण नाशिक महापालिका हद्दीतील आहेत. जिल्हा रुग्णालयात नऊ, डॉ. वसंत पवार वैद्यकीय महाविद्यालयात आठ, नाशिक ग्रामीणमध्ये १३३, मालेगाव महापालिका हद्दीत ५२ रुग्ण दाखल झाले आहेत.
हेही वाचा - पहिल्या दिवशी पॉझिटिव्ह कोरोना रिपोर्ट; दुसऱ्या दिवशी निगेटिव्ह! हा तर जिवासोबत खेळ