नाशिक : जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव चिंताजनकरित्या वाढतो आहे. ब्रेक द चेनअंतर्गत निर्बंध लागू असताना दुसरीकडे कोरोनाचा स्फोट जिल्ह्यात होतो आहे. गुरुवारी (ता.8) दिवसभरात 6 हजार 508 रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तर 34 बाधितांचा कोरोनाने बळी घेतला आहे. आढळलेले कोरोना बाधित आणि मृतांची संख्या आजवरचा एक दिवसातील उच्चांकी आकडा झाला आहे.
बाधितांच्या संख्येचा उच्चांक
जिल्ह्यासह नाशिक महापालिका व नाशिक ग्रामीणमध्ये आढलेल्या कोरोना बाधितांच्या संख्येनेदेखील उच्चांक गाठला. नाशिक महापालिका क्षेत्रातील 3 हजार 289 रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. नाशिक ग्रामीणमध्येही उच्चांकी 2 हजार 941 कोरोना बाधित आढळले. मालेगाव महापालिका क्षेत्रातील 125, जिल्हा बाहेरील 153 रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. दिवसभरात एकूण 34 बाधितांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. यापैकी सर्वाधिक 19 मृत नाशिक ग्रामीण भागातील आहेत. नाशिक शहरातील अकरा, मालेगावचे दोन, आणि जिल्हा बाहेरील दोघांचा कोरोनाने बळी घेतला आहे. नाशिक ग्रामीणमधील नाशिक तालुक्यासह इगतपुरी, दिंडोरी, निफाड तालुक्यातील प्रत्येकी तीन, चांदवड येवला तालुक्यातील प्रत्येकी दोन बाधितांचा मृत्यू झाला आहे. दिवसभरात 3 हजार 033 रुग्णांनी कोरोनावर यशस्वीरीत्या मात केली आहे. ॲक्टिव्ह रुग्ण संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे.
हेही वाचा - जेव्हा लसीकरण केंद्रावर पोचला 'कोरोनाबाधित'..! उपस्थितांमध्ये पळापळ आणि खळबळ
प्रलंबित अहवाल, संशयितांमध्ये वाढ
जिल्ह्यात सायंकाळी उशीरापर्यंत 6 हजार 132 रुग्णांचे अहवाल प्रलंबित आहेत. यापैकी नाशिक ग्रामीणमधील 3 हजार 329, नाशिक शहरातील 2 हजार 391, मालेगावचे 412 रुग्णांना अहवालाची प्रतिक्षा होती. दुसरीकडे जिल्ह्यातील रुग्णालये व गृहविलगीकरणात 4 हजार 872 संशयित दिवसभरात दाखल झाले. यापैकी नाशिक महापालिका क्षेत्रातील 4 हजार 503 रुग्ण नाशिक महापालिका क्षेत्रातील आहेत. तर जिल्हा रुग्णालयात नऊ, डॉ.वसंत पवार वैद्यकीय महाविद्यालयात नऊ, नाशिक ग्रामीणमध्ये 309, मालेगाव क्षेत्रातील 42 रुग्ण दाखल झाले आहेत.
हेही वाचा - नांदगाव हत्याकांडाचे गुढ अखेर उलगडले! नऊ महिने अन् दिडशे जबाबानंतर पोलिसांना यश