नाशिक जिल्ह्यात गुलाबी थंडीची चाहूल ; पुढील तीन दिवस धुक्याचा अंदाज

गुलाबी थंडीची चाहूल,www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा; राज्यात थंडीचे ठिकाण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नाशिक जिल्ह्यात गत दोन दिवसांपासून थंडीची चाहूल लागली असून, गुरुवारी किमान पारा १५.३ अंशांवर आल्याने गुलाबी थंडीची चाहूल लागली आहे. पहाटे थंडी, तर दुपारी सुसह्य ऊन असे आल्हाददायक हवामान आहे. ऑक्टोबर हीटचा परिणाम आता ओसरला असून, आल्हाददायक वातावरणामुळे नाशिककर सुखावले आहेत. गत दोन दिवसांपासून मध्यरात्री पारा १५ अंशांच्या आसपास येत आहे. (Nashik Weather)

भाद्रपद महिन्यापासूनच उन्हाची तीव्रता वाढली होती. ऑक्टोबर महिन्याच्या मध्यापर्यंत तापमानात चांगलीच वाढ झाल्यामुळे ऑक्टोबर हीटचा सामना नागरिकांना करावा लागला. गत दोन दिवसांपासून तापमानाचा पारा घसरू लागला असून, जिल्ह्यात थंडीची चाहूल जाणवू लागली आहे. बुधवारी आणि गुरुवारी किमान तापमान १५.३ अंशांपर्यंत नोंदवण्यात आले, तर महाराष्ट्रातील मिनी काश्मीर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या निफाडचे तापमान किमान १५ अंश नोंदवण्यात आले. रात्रीच्या तापमानात किमान दीड ते दोन अंशांनी घसरण झाली आहे.

भारतीय वेधशाळेने आपल्या अंदाजात नाशिकसाठी दि. २६ ते ३० ऑक्टोबरदरम्यान सलग चार दिवस सकाळी धुके पडणार असल्याचे नमूद केलेले आहे. गुरुवारी सकाळी म्हसरूळ, मखमलाबाद, दरी-मातोरी, तळेगाव, ढकांबे, आडगाव, दहावा मैल या परिसरात धुक्याची सुंदर चादर अंथरली गेली होती. चांदवडला किमान तापमान २० अंश, येवला २१.२ अंश, देवळा, मालेगाव, चांदवड या पट्ट्यातही पारा २० अंशांवर आला आहे.

थंडी वाढणार

कोजागरी पौर्णिमेच्या सुमारास नाशिकमध्ये थंडीचे आगमन होते. परंतु यंदा थंडीने चार दिवस अगोदरच आपल्या आगमनाचे संकेत दिले आहेत. हिवाळा ऋतू सुरू होण्यास अद्याप 15 दिवसांचा कालावधी असला, तरी पुढील काही दिवसांमध्ये ही थंडी वाढण्याची शक्यता आहे. गत दोन दिवसांपासून रात्री 10 च्या सुमारास थंडी जाणवत आहे. थंडीमुळे नाशिककर सुखावले असून, सकाळी फेरफटका मारणाऱ्यांच्या संख्येत वाढ होत आहे.

हेही वाचा :

The post नाशिक जिल्ह्यात गुलाबी थंडीची चाहूल ; पुढील तीन दिवस धुक्याचा अंदाज appeared first on पुढारी.