नाशिक जिल्ह्यात गोदा, दारणा, कादवा, गिरणेला पूर, 14 जुलैपर्यंत रेड अलर्ट

गोदावरीला पूर, नाशिक

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
जिल्ह्यात पावसाचा जोर कायम असून, जिल्ह्यातील प्रमुख धरणांच्या पाणलोट क्षेत्रात सोमवारी दिवसभर अतिवृष्टी झाली. यामुळे सर्व प्रमुख धरणांमधून जवळपास 80 हजार क्यूसेक वेगाने विसर्ग सुरू असल्याने गोदावरी, दारणा, कादवा, गिरणा या नद्यांना पूर आले होते. त्यातच हवामान विभागाने 14 जुलैपर्यंत जिल्ह्यात रेड अलर्टचा इशारा दिल्यामुळे राज्य आपत्ती नियंत्रण कक्षाने धुळे येथून एक पथक नाशिक येथे पाठवण्याचे आदेश दिले आहेत. पुढील चार दिवस पावसाचा जोर कायम राहिल्यानंतर निर्माण होणार्‍या परिस्थितीचा विचार करून जिल्हाधिकार्‍यांनी नदीकाठावरील सर्व नागरिकांना सावधानतेचा इशारा दिला आहे.

नाशिक जिल्ह्यातील पश्चिम भागातील इगतपुरी, पेठ, सुरगाणा, त्र्यंबकेश्वर, कळवण, सुरगाणा व दिंडोरी या तालुक्यांमध्ये सलग चार दिवसांपासून अतिवृष्टी सुरू आहे. यामुळे प्रमुख धरणांमध्ये 50 टक्क्यांच्या वर साठा झाला असून, अजूनही अतिवृष्टी सुरू असल्यामुळे जलसंपदा विभागाकडून खबरदारीचा उपाय म्हणून धरणांमधून विसर्ग करण्यास प्रारंभ केला आहे. यामुळे नाशिक जिल्ह्यातील प्रमुख धरणांमधून सोमवारी सायंकाळी सहाला जवळपास 85 हजार क्यूसेक वेगाने विसर्ग सुरू होता. या विसर्गामुळे गोदावरी, दारणा, कादवा, गिरणा नद्यांना पूर आले होते. गिरणा नदीला पूर आला असून, नदीतील विसर्ग 30 हजार क्यूसेक करण्यात आल्यामुळे जिल्हा प्रशासनाने नदीकाठच्या ठेंगोडा, वासूळ, महालपाटणे, निंबोळा, चिंचावड, आघार, पाटणे, दाभाडी, टेहरे, चंदनपुरी आदी गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.

जिल्हाधिकार्‍यांचे आवाहन
आगामी चार दिवसांत जिल्ह्यात अतिप्रमाणावर पाऊस व अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. त्यादृष्टीने धरण प्रकल्पातून विसर्गही सुरू असून, प्रसंगी विसर्ग वाढवण्यात येणार आहे. त्यादृष्टीने नदीकाठावरील सर्व नागरिकांनी सतर्क राहावे, तसेच नदीकाठावर पूर पाहण्यासाठी गर्दी करू नये, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष गंगाथरन डी. यांनी केले.

नाशिक जिल्ह्यात 14 जुलैपर्यंत रेड अलर्ट
उत्तर-मध्य महाराष्ट्रातील नाशिक व पुणे जिल्ह्यात पुढील तीन दिवस (12 ते 14 जुलै) अतिवृष्टीचा इशारा हवामान पूर्वानुमान विभागाने दिला आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार या जिल्ह्यांमधील घाटमाथा परिसरात अतिवृष्टी होणार आहे. राज्यात आठवडाभरापासून अतिवृष्टी सुरू आहे. कोकण, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, विदर्भ आदी भागांतील सर्व नद्यांना पूर आले असून, धरणांच्या साठ्यामध्येही वाढ झाली आहे. त्यामुळे मोठ्या शहरांमध्ये जूनमध्ये लागू केलेली पाणीकपातही मागे घेण्यात आलेली आहे. धरणांमधून सोडलेल्या विसर्गामुळे राज्यातील सर्व प्रमुख नद्यांना पूर आले आहेत.

नाशिक जिल्ह्यातही शु्क्रवार (दि. 8)पासून जोरदार पावसाला सुरुवात झाली असून, जिल्ह्याच्या पश्चिम भागात जोरदार अतिवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. जिल्ह्यातील गोदावरी, दारणा, कादवा, गिरणा, मोसम या प्रमुख नद्यांना पूर आले असून दारणा, गंगापूर, पालखेड या प्रमुख धरणांमधून विसर्ग सोडण्यात येत आहे. यामुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे. याचवेळी हवामान पूर्वानुमान विभागाने 12 ते 14 जुलै या तीन दिवसांत नाशिक व पुणे जिल्ह्यातील घाटमाथा परिसरात अतिवृ्ष्टीची शक्यता वर्तवली आहे. उत्तर महाराष्ट्रातील धुळे, जळगाव, नंदुरबार व नगर या जिल्ह्यांमध्येही काही ठिकाणी अतिवृष्टीचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यात 14 जुलैपर्यंत रेड अलर्ट व 15 जुलैस ऑरेंज अलर्ट देऊन खबरदारीचा इशारा दिला आहे.

महापूराचा धोका 

हवामान पूर्वानुमान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार 12 ते 14 जुलैदरम्यान नाशिक जिल्ह्यात प्रामुख्याने घाटमाथा परिसरात अतिवृ्ष्टी झाल्यास दारणा, गोदावरी, कादवा व गिरणा या नद्यांना महापूर येण्याची शक्यता व्यक्त होत आहे. जिल्हा आपत्ती निवारण कक्षाकडूनही या इशार्‍याच्या पार्श्वभूमीवर तयारी करण्यात आली आहे. गोदावरी व दारणेला पूर आल्यास निफाड तालुक्यातील चांदोरी, सायखेडासह पंचवटी परिसरातील जनजीवनावर त्याचा विपरीत परिणाम होत असतो.

जिल्ह्यातील धरणसाठा
धरणसाठा (दलघफूमध्ये) टक्के
गंगापूर 3752 67
काश्यपी 567 31
गौतमी 760 41
आळंदी 355 44
पालखेड 317 49
करंजवण 2375 44
वाघाड 1254 54
ओझरखेड 820 38
पुणेगाव 435 70
दारणा 5032 70
भावली 931 65
मुकणे 3660 51
वालदेवी 171 15
कडवा 1163 69
भोजापूर 19 5
चणकापूर 1989 45
हरणबारी 775 66
केळझर 113 20
नाग्यासाक्या 15 4
गिरणा 6315 34
पूनद 736 56
गंगापूर 67% भरले

हेही वाचा :

 

The post नाशिक जिल्ह्यात गोदा, दारणा, कादवा, गिरणेला पूर, 14 जुलैपर्यंत रेड अलर्ट appeared first on पुढारी.