Site icon

नाशिक : जिल्ह्यात ग्रामपंचायतींसाठी 80 टक्के मतदान; आज निकाल

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
जिल्ह्यातील चार तालुक्यांमधील 187 ग्रामपंचायतींसाठी रविवारी (दि. 16) साधारणत: 80 टक्के मतदान झाले. थेट सरपंचासह सदस्यांसाठी झालेल्या निवडणुकीत किरकोळ अपवाद वगळता शांततेत मतदान पार पडले. मतदारांनी त्यांचा कौल ईव्हीएममध्ये बंदिस्त केला. सोमवारी (दि. 17) तालुक्याच्या ठिकाणी मतमोजणी होणार आहे.

पेठ, सुरगाण, त्र्यंबकेश्वर आणि इगतपुरी या तालुक्यातील 187 ग्रामपंचायतींसाठी मतदान घेण्यात आले. चारही तालुक्यांत 611 मतदान केंद्रांवर घेण्यात आलेल्या मतदानासाठी मतदारांचा भरघोस प्रतिसाद लाभला. सकाळी 7 ते दुपारी साडेअकरा या वेळेत केंद्रांवर रांगा लागलेल्या होत्या. या कालावधीत 36 टक्के मतदान पार पडले. तर दुपारी उन्हाचा कडाका जाणवत असला तरी मतदार मोठ्या संख्येने मतदानासाठी घराबाहेर पडले. त्यामुळे 11.30 ते दुपारी साडेतीन वेळेत तब्बल 37 टक्के मतदारांनी त्यांचा मतदानाचा हक्क बजावला. तसेच चारनंतरही केंद्राकडे येणार्‍या मतदारांची संख्या अधिक होती. परिणामी साडेपाचनंतरही अनेक केंद्रांच्या बाहेर रांगा  लागलेल्या पाहायला मिळाल्या. चारही तालुक्यात काही ठिकाणी उमेदवार आणि त्यांच्या समर्थकांमध्ये किरकोळ वादावादी सोडता सर्वत्र सुरळीत मतदान प्रक्रिया पार पडली. त्यामुळे प्रशासनानेही सुटकेचा नि:श्वास सोडला आहे. दरम्यान, सोमवारी (दि.17) सकाळी 10 पासून तहसील कार्यालयांमध्ये मतमोजणीला प्रारंभ होणार आहे. दुपारी 12 पर्यंत सर्वच चित्र स्पष्ट होईल.

प्रत्येकाकडून विजयाचा दावा :

थेट सरपंच निवडीसह सदस्य पदांसाठी या निवडणुका घेण्यात आल्या. मतदानानंतर प्रत्येक उमेदवार आणि त्याच्या समर्थकांकडून आपल्याच विजयाचा छातीठोकपणे दावा केला जातो आहे. परंतु, मतदारांनी कोणत्या पारड्यात कौल टाकले याचा फैसला सोमवारी (दि.17) निकालानंतरच स्पष्ट होईल. त्यामुळे कोणाचा गुलाल उधळला जाणार अन् कोणाला पराभवाला सामोरे जावे लागते, यावरून मतदारांचीदेखील उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

मतदान झालेल्या ग्रामपंचायती : पेठ 69, सुरगाणा 59, इगतपुरी 05, त्र्यंबकेश्वर 54

हेही वाचा :

The post नाशिक : जिल्ह्यात ग्रामपंचायतींसाठी 80 टक्के मतदान; आज निकाल appeared first on पुढारी.

Exit mobile version