नाशिक : जिल्ह्यात तूर्तास टँकरचा फेरा दूर

पिण्याचे पाणी टॅंकर,www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

फेब्रुवारी महिन्याच्या अखेरीस एकीकडे जिल्ह्यात उन्हाचा पारा वाढला असताना पाण्याची उपलब्धता मुबलक आहे. त्यामुळे तूर्तास टँकरच्या फेऱ्यापासून जिल्हा दूर असल्याने हे आशादायक चित्र आहे. मात्र, मार्चअखेरीस उन्हाच्या वाढत्या तडाख्यासाेबत ग्रामीण भागातून टँकरची मागणी होण्याची शक्यता आहे.

यंदा फेब्रुवारीच्या दुसऱ्या पंधरवड्यात जिल्ह्यातून थंडी गायब झाली. त्यासोबत उन्हाच्या तीव्रतेमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. नाशिक शहरातील कमाल तापमानाचा पारा आताच ३५ अंश सेल्सिअसपलीकडे जाऊन पोहोचला असून, ग्रामीण भागातही वेगळे चित्र नाही. त्यामुळे पुढील तीन महिने उन्हाचा जोर कसा असेल, याचा अंदाज बांधला जाऊ शकतो. मात्र, एकीकडे उन्हाच्या झळा बसू लागल्या असताना तूर्तास ग्रामीण भागात पाण्याची टंचाई जाणवत नाही. त्याचे प्रमुख कारण म्हणजे गावोगावीचे पाण्याचे स्त्रोत पुनर्जीवित आहेत. पण उन्हाचा चटका जसाजसा वाढत जाईल, त्यानुसार ग्रामीण भागातून टँकरच्या मागणीत वाढ होणार आहे.

जिल्ह्यातील संभाव्य टंचाईचा विचार करता प्रशासनाने चालू वर्षी १ हजार ४५ गावे-वाड्यांना पाणीपुरवठ्यासाठी ११० टँकरची आवश्यकता भासू शकते. त्या दृष्टीने पाणीपुरवठ्यासाठी प्रशासनाकडून नियाेजन केले जात आहे. तसेच विहिरी अधिग्रहणावर प्रशासनाचा भर असणार आहे. टंचाईसाठी प्रशासनाची एकूण तयारी बघता ग्रामीण भागातील जनतेची तहान वेळेत भागवली जाणार आहे.

गेल्या वर्षी अवघे ४५ टँकर

सलग ४ वर्षांपासून जिल्ह्यात मान्सूनने सरासरी ओलांडली आहे. २०२१ मध्येही जिल्ह्यात १०० टक्के पाऊस झाला. त्याचा परिणाम म्हणजे गेल्या वर्षी एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात जिल्ह्यात टँकरचा फेरा सुरू झाला. तसेच संपूर्ण उन्हाळ्यात पाच तालुक्यांत केवळ ४५ टँकर सुरू होते. यंदाही असेच काहीसे आशादायक चित्र असून, टॅंकरच्या फेऱ्यात घट होऊ शकते.

हेही वाचा :

The post नाशिक : जिल्ह्यात तूर्तास टँकरचा फेरा दूर appeared first on पुढारी.