नाशिक जिल्ह्यात दिवसभरात ४२४ पॉझिटीव्‍ह, बरे झाले २७८ रूग्‍ण 

नाशिक : गेल्‍या दोन महिन्‍यांत कोरोनाची परीस्‍थिती नियंत्रणात येत असताना, डिसेंबरमध्ये पुन्‍हा कोरोना बाधित रूग्‍णांची संख्या वाढू लागली आहे. शुक्रवारी (ता. ४) दिवसभरात ४२४ रूग्‍णांचे अहवाल पॉझिटीव्‍ह आले, तर सात रूग्‍णांचा मृत्‍यू झाल्‍याची नोंद आहे. बरे झालेल्‍या रूग्‍णांची संख्या २७८ होती. यातून ॲक्‍टिव्‍ह रूग्‍णसंख्येत १३९ ने वाढ झाली असून, सद्यस्‍थितीत जिल्ह्यात ३ हजार २३९ बाधितांवर उपचार सुरू आहेत. 

नाशिक शहरातील २६९

शुक्रवारी आढळलेल्‍या बाधितांमध्ये नाशिक शहरातील २६९, नाशिक ग्रामीणमधील १४२, मालेगावचे १० तर जिल्‍हाबाहेरील तीन रूग्णांचा समावेश आहे. कोरोनामुक्‍त झालेल्यांमध्ये नाशिक शहरातील १५१, ग्रामीणमधील १०९, मालेगावचे दहा तर, जिल्‍हाबाहेरील आठ रूग्ण आहेत. सात मृतांपैकी एक नाशिक शहरातील, तर सहा ग्रामीण भागातील आहेत. शहरातील सराफ बाजार येथील ६६ वर्षीय महिला रूग्‍णाचा मृत्‍यू झाला आहे. तर ग्रामीणमध्ये सटाणा येथील ३८ वर्षीय पुरूष आणि ९० वर्षीय पुरूष, कोनांबे (ता. सिन्नर) येथील ६२ वर्षीय महिला, जायखेडा (ता. बागलाण) येथील ७२ वर्षीय पुरूष, देवळा येथील ६५ वर्षीय पुरूष, पाटोदा (ता. येवला) येथील ७१ वर्षीय पुरूषाचा कोरोनामुळे मृत्‍यू झाला आहे. 

हेही वाचा > नियतीची खेळी! लेकाला जेवण घेऊन माऊली आली शेतात; आणि घरी घडले भलतेच

बाधितांची एकूण संख्या १ लाख २ हजार ५४८

दरम्‍यान, यातून जिल्ह्यातील कोरोना बाधितांची एकूण संख्या १ लाख २ हजार ५४८ झाली आहे. यापैकी ९७ हजार ४८९ रूग्‍णांनी कोरोनावर यशस्‍वीरित्‍या मात केली आहे. १ हजार ८२० रूग्‍णांचा आतापर्यंत मृत्‍यू झालेला आहे. दिवसभरात दाखल रूग्‍णांमध्ये नाशिक महापालिका हद्दीतील रूग्‍णालये व गृहविलगीकरणात १ हजार १२१, नाशिक ग्रामीण रूग्‍णालये व गृहविलगीकरणात ८७, मालेगाव मनपा हद्दीत एक, डॉ. वसंत पवार वैद्यकीय महाविद्यालयात सात आणि जिल्‍हा रूग्‍णालयात सहा रूग्‍ण दाखल झाले आहेत. सायंकाळी उशीरापर्यंत १ हजार ०३२ रूग्‍णांचे अहवाल प्रलंबित होते. यापैकी ५५८ रूग्‍ण नाशिक ग्रामीण, ४२५ रूग्‍ण नाशिक शहर तर मालेगावच्‍या ४९ रूग्‍णांना अहवालाची प्रतिक्षा आहे.  

हेही वाचा > क्रूर नियती! तो' एक सेल्फीचा मोह अनावर; अन् माऊली लेकरांपासून दुरावली कायमची