नाशिक जिल्ह्यात दिवसभरात ३७१ रुग्ण कोरोना पॉझिटिव्‍ह; बरे झाले ३११ रुग्‍ण

नाशिक : जिल्ह्यात कोरोनामुक्‍त रुग्‍णांपेक्षा कोरोनाबाधितांची संख्या सातत्‍याने अधिक आढळत आहे. शनिवारी (ता. ५) दिवसभरात ३७१ रुग्‍णांचे अहवाल पॉझिटिव्‍ह आले, तर ३११ रुग्‍णांनी कोरोनावर मात केली. सहा रुग्‍णांचा उपचारादरम्‍यान मृत्‍यू झाला. यातून ॲक्टिव्‍ह रुग्‍णसंख्येत ५४ ने वाढ झाली असून, सद्यःस्‍थितीत तीन हजार २९३ रुग्‍णांवर उपचार सुरू आहेत. 

नाशिक शहरातील २१४

शनिवारी आढळलेल्‍या कोरोनाबाधितांमध्ये नाशिक शहरातील २१४, नाशिक ग्रामीणमधील १४३, मालेगावचे दहा, जिल्‍हाबाहेरील चार रुग्‍णांचा समावेश आहे. कोरोनामुक्‍त झालेल्‍या रुग्‍णांमध्ये नाशिक शहरातील १५०, नाशिक ग्रामीणमधील १४१, मालेगावचे तेरा, तर जिल्‍हाबाहेरील सात रुग्ण आहेत. तर जिल्ह्यातील सात मृत्‍यूंमध्ये नाशिक शहरातील चार व नाशिक ग्रामीणमधील दोन रुग्‍णांचा समावेश आहे. शहरातील राजीवनगर येथील ७० वर्षीय पुरुष, कोनार्कनगर येथील ६४ वर्षीय पुरुष, गोळे कॉलनीतील ९१ वर्षीय पुरुष, आडगाव येथील ५५ वर्षीय पुरुषाचा मृत्‍यू झाला. तर नाशिक ग्रामीणमधील दहीवड (ता. देवळा) येथील ६२ वर्षीय पुरुष आणि ६० वर्षीय महिला रुग्‍णाचा मृत्‍यू झाला आहे. 

हेही वाचा > नियतीची खेळी! लेकाला जेवण घेऊन माऊली आली शेतात; आणि घरी घडले भलतेच

एकूण कोरोनाबाधितांची संख्या एक लाख दोन हजार

दरम्‍यान, जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या एक लाख दोन हजार ९१९ झाली असून, यापैकी ९७ हजार ८०० रुग्‍णांनी कोरोनावर यशस्विरीत्‍या मात केली आहे. आतापर्यंत एक हजार ८२६ रुग्‍णांचा मृत्‍यू झालेला आहे. दिवसभरात दाखल रुग्‍णांमध्ये नाशिक महापालिका हद्दीतील रुग्‍णालये व गृहविलगीकरणात एक हजार १३६, नाशिक ग्रामीण रुग्‍णालये व गृहविलगीकरणात ४८, मालेगावला चार, डॉ. वसंत पवार वैद्यकीय महाविद्यालयात सात, जिल्‍हा रुग्‍णालयात पाच रुग्‍ण दाखल झाले आहेत. सायंकाळी उशिरा एक हजार १६८ रुग्‍णांचे अहवाल प्रलंबित होते. यापैकी नाशिक शहरातील ६०६, नाशिक ग्रामीणमधील ४९६, मालेगाव येथील ६६ रुग्‍णांना अहवालाची प्रतीक्षा होती. 

मालेगावमध्ये दोन मृत्यू 

मालेगाव : शहर व तालुक्यात शनिवारी दोन रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याने चिंता व्यक्त होत आहे. तब्बल दोन आठवड्यांनंतर या भागातील कोरोनाबाधितांचा मृत्यू झाल्याने शहरवासीयांनी काळजी घेणे गरजेचे आहे. शहर व परिसरात थंडीचा जोर वाढू लागला असतानाच, नागरिकांच्या निष्काळजीही वाढत असल्याचे दिसून येत आहे. शहरातील ५७ वर्षीय पुरुष व चंदनपुरी येथील ५८ वर्षीय पुरुषाचा मृतांमध्ये समावेश आहे. दरम्यान, शहरात नव्याने दहा रुग्ण आढळले आहेत. महापालिका क्षेत्रात सध्या गृहविलगीकरणासह उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या १४३ आहे. शहरात एकूण १७२ जणांचा कोरोनामुळे बळी गेला आहे. ६६ अहवाल प्रलंबित आहेत. तालुक्यातील २९ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तालुक्यातील ६१ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. बिकट परिस्थिती लक्षात घेऊन आज अपर पोलिस अधीक्षक चंद्रकांत खांडवी यांनी विनामास्क फिरणाऱ्यांवर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.  

 

हेही वाचा > क्रूर नियती! तो' एक सेल्फीचा मोह अनावर; अन् माऊली लेकरांपासून दुरावली कायमची