नाशिक जिल्ह्यात दिवसभरात ३१८ बाधित, सहा रुग्‍णांचा मृत्‍यू 

नाशिक : जिल्ह्यात कोरोनाबळींची संख्या पुन्‍हा वाढत आहे. शनिवारी (ता. १२) दिवसभरात सहा रुग्‍णांचा उपचारादरम्‍यान मृत्‍यू झाला. जिल्ह्यात ३१८ रुग्‍णांचे अहवाल पॉझिटिव्‍ह आले असून, बरे झालेल्‍या रुग्‍णांची संख्या ३७४ होती. यातून ॲक्टिव्‍ह रुग्‍णसंख्येत ६२ ने घट झाली असून, सद्यःस्‍थितीत तीन हजार ४७६ बाधितांवर उपचार सुरू आहेत. 

नाशिक शहरातील १८४ बाधित

शनिवारी आढळलेल्‍या कोरोनाबाधितांमध्ये नाशिक शहरातील १८४, नाशिक ग्रामीणमधील १०८, मालेगावचे २४, तर जिल्ह्याबाहेरील दोन रुग्‍णांचा समावेश आहे. बरे झालेल्‍या रुग्‍णांमध्ये नाशिक शहरातील १५९, नाशिक ग्रामीणमधील १९१, मालेगावचे १९, तर जिल्ह्याबाहेरील पाच रुग्ण आहेत. जिल्ह्यातील सहा मृतांमध्ये शहरातील एक आणि ग्रामीण भागातील पाच रुग्‍णांचा समावेश आहे. यात शहरात पंचवटीतील ८० वर्षीय महिला रुग्‍णांचा मृत्‍यू झाला आहे. तर नाशिक ग्रामीणमध्ये निफाड तालुक्‍यात ४२ वर्षीय पुरुष आणि ओझर मिग येथील ४५ वर्षीय पुरुष, ठेंगोडा (ता. बागलाण) येथील ७६ वर्षीय पुरुष, घोटी (ता. इगतपुरी) येथील ७५ वर्षीय पुरुष आणि सिन्नर येथील ६५ वर्षीय महिला रुग्‍णाचा मृत्‍यू झाला आहे. 

हेही वाचा>> मुलीचा विवाह सुरू असतानाच वधूपित्याला लुटले! विवाहाच्या आनंदात विरजण

एकूण संख्या एक लाख पाच हजार ११४

यातून कोरोनाबाधितांची एकूण संख्या एक लाख पाच हजार ११४ झाली असून, यापैकी ९९ हजार ७८० रुग्‍णांनी कोरोनावर मात केली आहे. आतापर्यंत एक हजार ८५८ रुग्‍णांचा मृत्‍यू झाला आहे. दिवसभरात दाखल रुग्‍णांमध्ये नाशिक महापालिका रुग्‍णालये व गृहविलगीकरणात ९४४, नाशिक ग्रामीण रुग्‍णालये व गृहविलगीकरणात ४१, मालेगाव रुग्‍णालयांत दोन, डॉ. वसंत पवार वैद्यकीय महाविद्यालयात सहा, तर जिल्‍हा रुग्‍णालयात तीन रुग्‍ण दाखल झाले आहेत. सायंकाळी उशिरापर्यंत एक हजार ११९ रुग्‍णांचे अहवाल प्रलंबित होते. यापैकी ५८७ अहवाल नाशिक शहरातील असून, ३६४ अहवाल नाशिक ग्रामीण आणि मालेगावच्‍या १६८ रुग्‍णांना अहवालाची प्रतीक्षा होती. 

हेही वाचा>> पुन्हा पबजी गेमने घेतला जीव? घरात गळफास घेत १४ वर्षीय मुलाची आत्महत्या