नाशिक जिल्ह्यात दिवसभरात प्रथमच दोन हजार ४२१ पॉझिटिव्‍ह 

नाशिक : जिल्ह्यात कोरोनाचा भडका होऊ लागला असून, दर दिवशी आढळणाऱ्या कोरोनाबाधितांची संख्या रोज नवीन विक्रम मोडत आहे. गुरुवारी (ता.१८) दिवसभरात दोन हजार ४२१ कोरोनाबाधित आढळून आले आहेत. दिवसभरात कोरोनावर मात केलेल्‍या रुग्‍णांची संख्या ८८८ राहिली. चौघा बाधितांचा मृत्‍यू झाला आहे. यातून ॲक्‍टिव्‍ह रुग्‍णसंख्येत एक हजार ५२९ ने वाढ झाली असून, सध्या जिल्ह्यात उपचार घेत असलेल्‍या कोरोनाबाधितांची संख्या १२ हजार ३८० वर पोचली आहे. 

प्रथमच दोन हजार ४२१ पॉझिटिव्‍ह 
यापूर्वी बुधवारी (ता. १७) दिवसभरात दोन हजार १४६ रुग्‍णांचे कोरोनाचे अहवाल पॉझिटिव्‍ह आले होते. यापूर्वी एका दिवसात इतक्‍या मोठ्या संख्येने कोरोनाबाधित आढळले नव्‍हते. दरम्‍यान, गुरुवारी या संख्येचाही विक्रम मोडीत निघाला. दिवसभरात दोन हजार ४२१ रुग्‍णांचा कोरोनाचा अहवाल पॉझिटिव्‍ह आला आहे. नव्‍याने आढळलेल्‍या कोरोनाबाधितांमध्ये नाशिक शहरातील एक हजार ३५६, नाशिक ग्रामीणमधील ८३८ कोरोना बाधित रुग्‍ण आढळून आले आहेत. मालेगावला १८४, तर जिल्‍हाबाहेरील ४३ रुग्‍णांचे अहवाल पॉझिटिव्‍ह आले आहेत. दिवसभरात चार बाधितांचा उपचारादरम्‍यान मृत्‍यू झाला असून, यापैकी प्रत्‍येकी दोन नाशिक शहर व नाशिक ग्रामीणमधील आहेत. मृतांमध्ये त्रिमूर्ती चौक परिसरातील ४६ वर्षीय महिला, त्र्यंबक रोडवरील ६५ वर्षीय पुरुष, तर नाशिक ग्रामीणमध्ये निफाड तालुक्‍यातील ६६ वर्षीय पुरुष, तळेगावरोही (ता. चांदवड) येथील ६२ वर्षीय बाधिताचा मृत्‍यू झाला. 

तीन हजार ३४४ अहवाल प्रलंबित 
गुरुवारी सायंकाळी उशिरापर्यंत तीन हजार ३४४ रुग्‍णांचे अहवाल प्रलंबित होते. यात सर्वाधिक एक हजार ८४७ प्रलंबित अहवाल नाशिक ग्रामीणमधील आहेत. नाशिक शहरातील ९१७, मालेगावमधील ५८० अहवाल प्रलंबित होते. जिल्‍हाभरातील रुग्‍णालये व गृहविलगीकरणात दिवसभरात दोन हजार ४९३ रुग्‍ण दाखल झाले. यापैकी दोन हजार ३५२ रुग्‍ण नाशिक महापालिका क्षेत्रातील आहेत. जिल्‍हा रुग्‍णालयात दोन, डॉ. वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालयात १६ रुग्‍ण दाखल झाले. नाशिक ग्रामीणमधील ९८, मालेगावला २५ संशयित दाखल झाले आहेत.