नाशिक जिल्ह्यात दुष्काळ जाहीर करण्याची मागणी

दादा भुसे, मंत्री अनिल पाटील www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा; नाशिक जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करण्याची मागणी पालकमंत्री दादा भुसे यांनी राज्याचे मदत पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांच्याकडे केली आहे. यासंदर्भात पाटील यांना पत्र पाठवून भुसे यांनी नाशिक जिल्ह्यातील दुष्काळसदृश परिस्थिती निदर्शनास आणून दिली आहे.

चालू वर्षी खरीप हंगामामध्ये नाशिक जिल्ह्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झालेली आहे. शेतकरी हवालदिल झालेला आहे. रब्बी हगांमातही पाणी अभावी पुरेशा प्रमाणात पेरण्या झालेल्या नाहीत. त्यामुळे दुष्काळी परिस्थितीत शेतकऱ्याला आवश्यक ती मदत करण्यासाठी नाशिक जिल्हयातील सर्व तालुक्यात दुष्काळ जाहिर करण्यात येऊन शेतकऱ्याला आवश्यक ती मदत करण्यात यावी अशी विनंती भुसे यांनी पत्रात केली आहे. राज्यात पाण्याची टंचाई आहे. पाणीसाठा देखील नैसर्गिक दृष्ट्या पुरेशा प्रमाणात नाही. सामान्य नागरिकांना तसेच पशुधनाला जिल्ह्यात याचा फटका बसत आहे. त्यामुळे नाशिक जिल्ह्यात सरकारने सरसकट दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांची दिवाळी गोड करावी सरकारने दुसऱ्या टप्प्यात नाशिक जिल्ह्याचा समावेश दुष्काळात करावा, असे देखील भुसे यांनी म्हटले आहे.

३१ ऑक्टोबर २०२३ रोजी काढलेल्या शासन निर्णयानुसार १५ जिल्ह्यातील २४ तालुक्यांमध्ये गंभीर, तर १६ तालुक्यांमध्ये मध्यम स्वरुपाचा दुष्काळ जाहीर केला असून जून ते सप्टेंबर या कालावधीतील पर्जन्याची तूट, उपलब्ध असलेल्या भूजलाची कमतरता, दुरसंवेदन विषयक निकष, वनस्पती निर्देशांक, मृदू आर्द्रता, पेरणीखालील क्षेत्र आणि पिकांची स्थिती या सर्व घटकांचा विचार करून दुष्काळ घोषित करण्यात आलेल्या ४० तालुक्यांमध्ये काही सवलती देखील जाहीर करण्यात आल्या आहेत. येणाऱ्या दुसऱ्या टप्प्यात नाशिक जिल्ह्याचा समावेश करण्याची मागणी भुसे यांनी केली आहे.

हेही वाचा :

The post नाशिक जिल्ह्यात दुष्काळ जाहीर करण्याची मागणी appeared first on पुढारी.