नाशिक जिल्ह्यात पावसाची हजेरी अन् गारांचा मारा

गारपीट www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
जिल्ह्यात सलग पाचव्या दिवशी ठिकठिकाणी विजेचा कडकडाट व वादळी वार्‍यासह अवकाळी पावसाने हजेरी लावली. तर चांदवड, नांदगाव, सिन्नर-इगतपुरीचा पूर्व भाग, कळवण आणि निफाडच्या, त्र्यंबकेश्वरच्या काही भागात जोरदार गारपीट झाल्याने तेथे रब्बी हंगामातील कांदा, गहू, हरभरा पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. द्राक्षबागा आणि टरबुजाचेही प्रचंड नुकसान झाले. नाशिक शहरासह देवळा व नांदगावमध्ये जोरदार सरी बरसल्या. येत्या 48 तासांत जिल्ह्याला अवकाळीचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

पश्चिमी चक्रवात वार्‍यांमुळे महाराष्ट्रावर अवकाळीसह गारपिटीचे संकट घोंगावत आहे. नाशिक जिल्ह्याच्या हवामानावर त्याचा परिणाम झाला आहे. पाच दिवसांपासून जिल्ह्याला अवकाळी पाऊस व गारपिटीने झोडपून काढले असून, त्याचा जोर कायम आहे. नाशिक शहर व परिसरात शनिवारी (दि. 18) दिवसभर ढगाळ हवामानानंतर सायंकाळी 5 ला विजेच्या कडकडाटासह जोरदार पावसाने हजेरी लावली. साधारणत: तासभर झालेल्या पावसाने नाशिककरांची दैना उडाली. स्मार्ट सिटीच्या कामांमुळे शहर परिसरात खोदून ठेवलेल्या रस्त्यांवरून मार्गक्रमण करताना वाहनचालकांची तारांबळ उडाली. पावसाने हवेत गारवा निर्माण झाल्याने शहरवासीयांनी कपाटात ठेवलेले उबदार कपडे बाहेर काढले. जिल्ह्यात घोटी, इगतपुरी, त्र्यंबक पट्ट्यात जोरदार पाऊस झाला. या पट्ट्यातील गहू, हरभरा पिकाला जबरदस्त फटका बसला आहे. देवळा तालुक्यामध्ये ठिकठिकाणी पावसाने हजेरी लावली. त्यामुळे तालुक्यातील प्रमुख पीक असलेल्या कांद्यासह अन्य शेतीपिकांना या पावसाचा फटका बसतो आहे. नांदगाव तालुक्यात 6.30 च्या सुमारास जोरदार सरी बरसल्या. तासाभराच्या पावसाने रब्बी पिकांना फटका बसला आहे. जिल्ह्याच्या अन्य भागांतही ठिकठिकाणी पावसाने हजेरी लावली. दरम्यान, पुढील दोन दिवस जिल्ह्यात ठिकठिकाणी गारपिटीसह जोरदार सरींचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तविण्यात आला आहे. अवकाळीने पशुधन हानी जिल्ह्यात अवकाळीने शेतकर्‍यांची पशुधन हानी झाली आहे. गेल्या 24 तासांमध्ये पाच जनावरे दगावली. त्यामध्ये नाशिक तालुक्यात दोन बैल, पेठला म्हैस तसेच नांदगाव व मालेगावमध्ये प्रत्येकी एक गाय हे गतप्राण झाले. तसेच त्र्यंबकेश्वर आणि चांदवड तालुक्यांत गारपीट झाली.

या ठिकाणी गारांचा मारा..
निफाड तालुक्यातील रानवड, कुंभारी, देवपूर, पंचकेश्वर परिसरात शनिवारी सायंकाळी 5 च्या सुमारास जोरदार गारपीट झाली. सिन्नर आणि इगतपुरी पूर्व भागात दुपारनंतर जोरदार गारपीट झाल्याने या पट्ट्यातील टोमॅटोची फळगळ होऊन प्रचंड नुकसान झाले आहे. देवळा तालुक्यातील दहिवडच्या भौरी मळा परिसरात शनिवारी, दि. 18 दुपारी 3 ला गारपीट झाली. त्र्यंबकेश्वर परिसरातील काही भागांत गारपीट झाली आहे.

हेही वाचा:

The post नाशिक जिल्ह्यात पावसाची हजेरी अन् गारांचा मारा appeared first on पुढारी.