नाशिक : पुढारी वृत्तसेवा ; देशाच्या संसदेत महिलांना ३३ टक्के आरक्षण देण्यात आले असताना नाशिक जिल्ह्यात महिला मतदारांचा टक्का घसरला आहे. जिल्ह्यात दर हजार पुरुष मतदारांमागे केवळ ९१४ मतदारांची नोंद आहे. लोकशाहीच्या दृष्टीने ही चिंताजनक बाब आहे.
आगामी लोकसभा निवडणुकीसाठी जिल्हा प्रशासनाने तयारी सुरू केली आहे. जिल्ह्यातील पंधराही विधानसभा मतदारसंघांत विशेष मतदार नोंदणी मोहीम हाती घेण्यात आली आहे. मात्र, एकीकडे प्रशासन नोंदणीसाठी विशेष मोहीम राबवित असताना जिल्हाभरात पुरुषांच्या तुलनेत महिला मतदारांचे प्रमाण कमी असल्याचे सत्य समोर आले आहे. एक हजार पुरुषांमागे केवळ ९१४ महिला मतदार आहेत. विशेष म्हणजे मतदारसंख्येच्या दृष्टीने सर्वात मोठा मतदारसंघ असलेल्या नाशिक पश्चिममध्येही पुरुषांच्या तुलनेत महिला मतदारांंचे प्रमाण कमी आहे.
जिल्ह्यात आजच्या घडीला एकूण ४६ लाख ५० हजार ६४० मतदार आहेत. त्यापैकी पुरुष मतदार २४ लाख २९ हजार ८०१ असून, महिला मतदारांची संख्या २२ लाख २० हजार ७५८ इतकी आहे. एकूण मतदार संख्येचा विचार करता पुरुषांचे प्रमाण ५२.२५ टक्के तसेच ४७.७५ टक्के महिला मतदार आहे. दरम्यान, दिव्यांग मतदारांची संख्या १९ हजार ४६१ असून, त्यामध्ये केवळ ७ हजार ३६७ महिला मतदार आहेत. एकूणच जिल्ह्यातील मतदारयादीतील महिलांचा घसरलेला टक्का बघता जिल्हा निवडणूक शाखेच्या चिंतेत भर पडली आहे.
नोंदणीसाठी पुढे यावे
जिल्ह्यात १ जूनपासून राबविलेल्या विशेष पुरवणी यादी मोहिमेत पुरुषांच्या तुलनेत महिला मतदारांची नोंदणीत वाढ झाली आहे. यामध्ये १५ हजार ४३५ पुरुष तर १७ हजार ९६८ महिला मतदारांनी नाव यादीत समाविष्ट केले. यंदाही महिला मतदारांच्या अधिकाधिक नोंदणीसाठी प्रशासन आग्रही आहे. महिलांनी पुढे येत मतदारयादीत नाव नोंदवावे, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.
०.६१ टक्के युवकांची नोंद
जिल्ह्याच्या एकूण लोकसंख्येपैकी १८ व १९ वयाेगटांमधील युवकांची साधारणत: संख्या २ लाख ४६ हजार ८७९ इतकी आहे. जिल्ह्याच्या लोकसंख्येच्या तुलनेत हे प्रमाण ३.४ टक्के इतके आहेे. मात्र, असे असताना आतापर्यंत केवळ ४४ हजार ३४१ युवकांनी मतदारयादीत नावनोंदणी केली आहे. एकूण लोकसंख्येशी तुलना केल्यास केवळ ०.६१ टक्के नवयुवकांची नोंदणी पूर्ण झाली आहे.
हेही वाचा :
- space station …म्हणून स्पेस स्टेशन कधीच पृथ्वीवर कोसळत नाही
- Pune News : सहीच नाही; पण पालकमंत्री म्हणताहेत ‘कामे लवकर करा’
- पुणे हादरले ! घरच्यांच्या समोरच केला तरुणाचा खून
The post नाशिक जिल्ह्यात महिला मतदारांचा टक्का घसरला appeared first on पुढारी.