नाशिक : जिल्ह्यातील रुग्णसंख्या रोज नवा उच्चांक प्रस्थापित करत असून, शुक्रवारी (ता. २६) ही संख्या थेट चार हजारांच्या पुढे पोचली. जिल्ह्यात दिवसभरात ४ हजार ०९९ जणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. बरे झालेल्या रुग्णांची संख्या दोन हजार १५८ होती. तर, नऊ बाधितांचा मृत्यू झाला आहे. ॲक्टिव्ह रुग्णंसंख्येत लक्षणीय वाढ झाली असून, सध्या जिल्ह्यात उपचार घेणाऱ्या कोरोना बाधितांची संख्या २० हजार ९०५ झाली आहे.
शुक्रवारी नाशिक शहरातील दोन हजार ०९० जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. हीदेखील शहरातील आत्तापर्यंतची सर्वाधिक संख्या आहे. दुसरीकडे नाशिक ग्रामीणमधील १ हजार ७०६, मालेगावचे २३१, तर जिल्हा बाहेरील ७२ रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. नऊ बाधितांचा मृत्यू झाला असून, यात नाशिक शहर व ग्रामिणमधील प्रत्येकी चार आणि एक जिल्हाबाहेरील रूग्णाचा समावेश आहे. बरे झालेल्या रुग्णांमध्ये नाशिक शहरातील १ हजार चारशे, नाशिक ग्रामीणमधील ६१०, मालेगावचे ८०, तर जिल्हा बाहेरील ६८ रुग्ण आहेत.
हेही वाचा - सख्ख्या भावांची एकत्रच अंत्ययात्रा पाहण्याचे आई-बापाचे दुर्देवी नशिब; संपूर्ण गाव सुन्न
साडे पाच हजार अहवाल प्रलंबित
रुग्णसंख्या वाढीचे नवे उच्चांक गाठले जात असताना, दुसरीकडे प्रलंबित अहवालांची वाढती संख्याही चिंता वाढविणारी आहे. शुक्रवारी सायंकाळी उशीरापर्यंत ५ हजार ५१७ रुग्णांचे अहवाल प्रलंबित होते. यापैकी २ हजार ६८६ संशयित नाशिक ग्रामीणमधील, १ हजार ७२२ प्रलंबित अहवाल नाशिक शहरातील, तर मालेगावच्या १ हजार १०९ रुग्णांना अहवालाची प्रतिक्षा होती. जिल्हाभरातील रुग्णालये व गृहविलगीकरणात २ हजार ७४९ रुग्ण दाखल झाले आहेत. यात, नाशिक महापालिका हद्दीतील २ हजार ५२२ रुग्णांचा समावेश आहे. जिल्हा रुग्णालयात तेरा, डॉ. वसंत पवार वैद्यकीय महाविद्यालयात पाच रुग्ण दाखल झाले आहेत. नाशिक ग्रामीणमध्ये १५३, मालेगावला ५६ संशयित विविध रुग्णलयांत व गृहविलगीकरणात आहेत.
हेही वाचा - पहिल्या दिवशी पॉझिटिव्ह कोरोना रिपोर्ट; दुसऱ्या दिवशी निगेटिव्ह! हा तर जिवासोबत खेळ