नाशिक जिल्ह्यात वर्षभरात १,६५५ अपघात; रस्ते अपघातांत मालेगाव तालुका आघाडीवर

दाभाडी (जि. नाशिक) : नाशिक जिल्ह्यात रस्ता अपघातात २०२० या वर्षात सर्वाधिक अपघात मालेगाव तालुक्यात घडले आहेत. जिल्ह्यात अपघात व मृत्युदर ग्रामीण भागात सर्वाधिक असल्याचे प्रादेशिक परिवहन कार्यालयाने घोषित केले आहे. रस्ता सुरक्षा अभियानाद्वारे प्रबोधन आरंभले आहे. 

वर्षभरात १,६५५ अपघातांत ९७२ ठार 

२०२० या वर्षात जिल्ह्यात एकूण एक हजार ६५५ अपघातांत ९७२ जणांचा मृत्यू झाला असून, एक हजार ५६ जण गंभीर जखमी झाले. जिल्ह्यातील एकूण अपघातांपैकी तब्बल १७ टक्के अपघात मालेगाव तालुक्यात घडले आहेत. 
जिल्ह्यातील तालुकानिहाय वार्षिक अपघात आराखडा प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून प्रसिद्ध करण्यात आला आहे.

हेही वाचा> काय सांगता! विवाह आणि तो ही फक्त ५१ रुपयांत; कोणीही मोहिमेत होऊ शकतं सहभागी  

मालेगाव तालुका अपघातांमध्ये आघाडीवर

नाशिक शहर व नाशिक तालुका अपघातात आघाडीवर असला, तरी तालुकास्तरावर तुलनात्मकदृष्टीने मालेगाव तालुका अपघातांमध्ये आघाडीवर आहे. राष्ट्रीय महामार्गावरून परराज्यातील वेगवान वाहतूक, मालेगावहून मनमाड-शिर्डी-पुणे; चाळीसगाव, औरंगाबाद, सटाणा, साक्री, गुजरातमध्ये वाहतुकीसाठी मालेगाव मध्यवर्ती ठिकाण ठरते. दाट लोकवस्तीचे शहर, शेती व कापड उद्योग, विविध लघुउद्योग यामुळे शहर परिसर गजबजलेला असतो. दूरदृष्टीच्या अभावामुळे रस्त्यांचे संथगतीने होणारे रुंदीकरण, कामचलाऊ रस्ता दुरुस्ती, लोकप्रतिनिधींची उदासीनता, वर्षभर खड्डेमय दर्शन, बेशिस्त वाहन चालविणे आदी कारणांमुळे अपघातांचे प्रमाण वाढत आहे. तालुकानिहाय अपघातप्रमाण तक्ता मालेगाव तालुक्याचे वास्तव कथन करणारा ठरतो आहे. प्रादेशिक परिवहन कार्यालयाने या आकडेवारीद्वारे अपघात रोखण्यासाठी प्रबोधन आरंभले आहे. ‘रस्ता सुरक्षा जीवन सुरक्षा’ हे ब्रीद घेत राज्य मोटार वाहन विभाग व प्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे ३२ वे रस्ता सुरक्षा अभियान राबविण्यात येत आहे. जिल्हाभर चालकांना गेल्या वर्षीच्या आकडेवारीची माहिती देत प्रबोधन करण्यात येत आहे. 

हेही वाचा> बहिणीपाठोपाठ भावाची उत्तुंग कामगिरी! एकाच आठवड्यात सुराणा कुटुंबाला जणू जॅकपॉट

अपघातातील निष्कर्ष 

ग्रामीण भागामध्ये एकूण अपघातांपैकी राष्ट्रीय महामार्गावरील अपघातांचे प्रमाणे ३०.११ टक्के असून, अपघातांमध्ये मृत्यूचे प्रमाणे २९ टक्के इतके आहे. सर्वांत जास्त अपघात सकाळी आठ ते दुपारी बारा आणि दुपारी चार ते रात्री बारा या कालावधीत झालेले आहेत. वाहन प्रकारानुसार सर्वांत जास्त अपघात व अपघातामध्ये मृत्युमुखी होण्याचे प्रमाण दुचाकीस्वार (५०.०३ टक्के) आणि खासगी कार व जीप (२३ टक्के) मधील व्यक्तींचे आहे. अपघातामध्ये मृत्युमुखी पडणाऱ्या व्यक्तींमध्ये सर्वांत जास्त प्रमाण १५ ते २५ वयोगटातील तरुणांचे ४० टक्के आहे. सर्वांत जास्त अपघात अतिवेगाने वाहन चालविल्याने (७१ टक्के) झालेले आहेत. तालुकानिहाय माहितीनुसार मालेगाव तालुक्यात सर्वांत जास्त १७ टक्के अपघात झालेले आहेत. 

 

वाहतुकीच्या नियमांची अंमलबजावणी, नियंत्रित वेग यासह हेल्मेट, सीटबेल्ट आदी सुरक्षा साधनांचा वापर केल्यास अपघात प्रमाण आटोक्यात येऊन जीवितहानी टळू शकते. प्रबोधनात लोकसहभाग गरजेचा आहे. 
-किरण बिडकर, प्रादेशिक परिवहन अधिकारी, मालेगाव