नाशिक जिल्ह्यात सहा महिन्यांत २६७ बालकांचा मृत्यू

बालकांचा मृत्यू,www.pudhari.news

नाशिक : वैभव कातकाडे

जन्मदर वाढविण्यासाठी तसेच बालमृत्यू रोखण्यासाठी शासनस्तरावर प्रयत्न होत असले, तरी जिल्ह्यातील बालमृत्यूंचे प्रमाण चिंताजनकच आहे. त्यामुळे नक्की कोणते प्रयत्न शासनस्तरावर होत आहेत, असा प्रश्न निर्माण होत आहे. एप्रिल ते सप्टेंबर या सहा महिन्यांत २६७ बालकांचा मृत्यू विविध कारणांनी झाला आहे. यामध्ये ० ते १ वर्षाचे अर्भक तब्बल २२४, तर १ ते ५ वर्षांपर्यंतच्या ४३ बालकांचा समावेश आहे. जिल्ह्यातील आरोग्य विभागाच्या आहवालातून ही धक्कादायक माहिती समोर आली आहे.

जिल्हा परिषदेतील आरोग्य विभागातर्फे जिल्ह्यातील महापालिका कार्यक्षेत्र वगळता, उर्वरित जिल्ह्यातील बालकांच्या मृत्यूची नोंद ठेवली जाते. दरवर्षी एप्रिल महिन्यापासून तालुकानिहाय ही माहिती संघटित केली जाते. त्यानुसार यंदाच्या वर्षाच्या पहिल्या सहा महिन्यांत म्हणजेच सप्टेंबर अखेरपर्यंत २६७ बालकांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. त्र्यंबकेश्वर तालुक्यात सर्वाधिक ४१ बालके दगावली आहेत. यात तब्बल ३८ बालके एक वर्षाखालील, तर ३ बालके पाच वर्षांखालील आहेत.

जिल्ह्यात दगावलेल्या २६७ बालकांमध्ये १५९ बालके, तर १०८ बालिकांचा समावेश आहे. तसेच जन्मानंतर २८ दिवसांच्या आत १७९, २९ दिवस ते १ वर्ष या कालावधीत ४५, तर १ ते ५ वर्षे या कालावधीत ४३ बालकांचा मृत्यू झाला आहे.

तारखेपूर्वीची प्रसूती धोकादायक

बालके दगावण्याच्या कारणांमध्ये कमी वजनाची, प्रसूतिपूर्व तारखेला प्रसूत झालेल्या ५६ बालकांचा समावेश आहे. त्या खालोखाल जंतुसंसर्ग झालेल्या ४३, जन्मत:च श्वास घ्यायला त्रास असलेल्या ४१, इतर आजारांमुळे ३३, श्वसननलिकेच्या गंभीर आजाराने २९, जन्मत:च व्यंग असलेल्या २४, न्यूमोनियामुळे २१ अशा इतर कारणांनी बालकांचा मृत्यू झालेला आहे.

तालुका- दगावलेल्या बालकांची संख्या

बागलाण ९

चांगवड १३

देवळा २

दिंडोरी २४

इगतपुरी २७

कळवण १४

मालेगाव ४

नाशिक २३

नांदगाव ३

निफाड २८

पेठ २२

सुरगाणा २८

सिन्नर १२

त्र्यंबकेश्वर ४१

येवला १७

——-०——–

The post नाशिक जिल्ह्यात सहा महिन्यांत २६७ बालकांचा मृत्यू appeared first on पुढारी.