नाशिक जिल्ह्यात सहा लाख चाचण्यांचा टप्पा पूर्ण; ७६ टक्‍के रुग्‍णांचे अहवाल निगेटिव्‍ह

नाशिक : जिल्ह्यात काही दिवसांपासून कोरोनाचा प्रादुर्भाव वाढलेला असताना चाचण्यांच्‍या प्रमाणातही वाढ झाली आहे. कोरोनाचा पहिला बाधित आढळल्‍यापासून आत्तापर्यंत सहा लाखांहून अधिक रुग्‍णांचे स्‍वॅब तपासले आहेत. यापैकी ७६ टक्‍के रुग्‍णांचे अहवाल निगेटिव्‍ह आले आहेत. दरम्‍यान, मार्चमध्ये कोरोनाबाधितांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली असून, रोज सरासरी तीन हजार ३०० चाचण्या केल्‍या जात आहेत.

जिल्ह्यात पाच लाखांहून सहा लाख चाचण्यांचा टप्पा पूर्ण करण्यासाठी १४५ दिवसांचा कालावधी लागला आहे. गेल्‍या १ फेब्रुवारीला पाच लाख चाचण्यांचा टप्पा पूर्ण केला होता. यानंतर रोजच्‍या चाचण्यांचे प्रमाण घटले होते. मार्चमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना स्‍वॅब चाचणीच्‍या प्रमाणातही वाढ झाली आहे. यातून गेल्‍या १४५ दिवसांत झालेल्‍या एक लाखपैकी तब्‍बल ६० हजार ००४ चाचण्या १ ते १८ मार्चदरम्‍यान झाल्‍या आहेत. सहा लाख चाचण्यांचा टप्पा गेल्‍या गुरुवारी (ता. १८) गाठला आहे. सहा लाख दोन हजार ४५६ चाचण्यांपैकी चार लाख ५८ हजार २२५ रुग्‍णांचे अहवाल निगेटिव्‍ह आले आहेत. अर्थात, या रुग्‍णांना कोरोनाची लागण झालेली नाही. तर एक लाख ४० हजार ८८७ रुग्‍णांचा कोरोनाचा अहवाल पॉझिटिव्‍ह आला आहे. 
 
एक लाखात २५ हजार बाधित 

शेवटच्‍या एक लाख चाचण्यांमध्ये पॉझिटिव्हिटी रेट अधिक राहिला आहे. या चाचण्यांपैकी २४ हजार ९१३ रुग्‍णांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्‍ह आला आहे. तर १३ हजार ७१३ रुग्‍णांनी कोरोनावर यशस्‍वीरीत्‍या मात केली आहे. १४५ बाधितांचा उपचारादरम्‍यान मृत्‍यू झाला असून, यापैकी बहुतांश मृत ज्‍येष्ठ नागरिक आहेत. यापूर्वी चारपासून पाच लाख चाचण्या पूर्ण होत असताना, या एक लाख चाचण्यांमध्ये सर्वांत कमी ११ हजार १७८ रुग्‍णांचा अहवाल पॉझिटिव्‍ह आला होता. 

जिल्ह्यातील कोरोना चाचणीचे टप्पे 

१ लाख चाचण्या---------------१७ ऑगस्‍ट 
२ लाख चाचण्या--------------१५ सप्‍टेंबर 
३ लाख चाचण्या-------------१२ ऑक्‍टोबर 
४ लाख चाचण्या-------------११ डिसेंबर 
५ लाख चाचण्या-------------१ फेब्रुवारी 
६ लाख चाचण्या-------------१८ मार्च