नाशिक जिल्ह्यात ३०-३९ वयोगटात सर्वाधिक मतदार

मतदार www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा; जिल्ह्यात नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या प्रारूप मतदार यादीनुसार ३० ते ३९ या वयोगटामध्ये मतदारांची संख्या सर्वाधिक आहे. या गटात एकूण मतदार संख्येच्या तब्बल २०.२६ टक्के मतदार आहेत. तर वयाची ८० वर्षे पूर्ण केलेल्या मतदारांचे प्रमाण २.४४ टक्के आहे.

पुढील वर्षी देशभरात लोकसभा निवडणुकीचा आराखडा रंगणार आहे. देशावर सत्ता प्रस्थापित करण्यासाठी आता साऱ्याच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. दुसरीकडे निवडणुकीच्या तयारीसाठी प्रशासकीय पातळीवरही वेग आला आहे. जिल्हा प्रशासनाने २ दिवसांपूर्वी मतदारयाद्यांचा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम घोषित केला. लोकसभेपूर्वीचा हा अंतिम कार्यक्रम असल्यामुळे मतदारयादीत नाव नोंदीसाठी ही अंतिम संधी असणार आहे. निवडणूक शाखेने या निमित्ताने जिल्ह्यातील पंधरा विधानसभा मतदारसंघांतील प्रारूप मतदारयाद्या प्रसिद्ध केल्या आहेत.

निवडणूक शाखेने प्रसिद्ध केलेल्य याद्यांनुसार जिल्ह्यात एकूण मतदार संख्या ४६ लाख ५० हजार ६४० इतकी आहे. मतदारसंख्येचे वयोगटानुसार वर्गीकरण केल्यास ३० ते ३९ वयोगटामध्ये सर्वात जास्त म्हणजे १० लाख ९८ हजार ८५० मतदार आहेत. त्या खालोखाल ४० ते ४९ वयोगटामध्ये १० लाख ६२ हजार ४२५ मतदारसंख्या आहे. तर ज्येष्ठ मतदार म्हणजेच ८० वर्षांहून अधिक १ लाख ३२ हजार ३३८ मतदार आहेत. यादीमध्ये १८ व १९ वयोगट तळाला असून, या प्रवर्गात केवळ ४४ हजार ३४१ मतदार नोंदणी झाली आहे.

दोन लाख नोंदणीची अपेक्षा

लोकसभेपूर्वी होणाऱ्या विशेेष मोहिमेअंतर्गत दोन लाख मतदार नोंदणीची अपेक्षा प्रशासनाला आहे. जिल्हाभरात विशेष करून नवमतदारांच्या अधिक नोंदणीसह दिव्यांग तसेच महिला मतदारांची संख्या वाढावी यासाठी प्रशासन विविध शिबिरे व उपक्रम हाती घेणार आहे.

वयोगटानिहाय मतदार

वयोगट- संख्या- टक्के

18-19 44341- 0.81

20-29 891698- 16.44

30-39 1098850 -20.26

40-49 1062425- 19.59

50-59 715027- 13.18

60-69 459725- 8.47

70-79 246236- 4.54

80+ 132338 -2.44

The post नाशिक जिल्ह्यात ३०-३९ वयोगटात सर्वाधिक मतदार appeared first on पुढारी.