
नाशिक : पुढारी वृत्तसेवा
उन्हाच्या वाढत्या तडाख्यासोबतच जिल्ह्याच्या ग्रामीण भागाला टंचाईच्या तीव्र झळा जाणवत आहेत. परिणामी ग्रामस्थांना पाण्यासाठी टँकरवर अवलंबून राहावे लागते आहे. सद्यस्थितीत पाच तालुक्यांतील ३९ गावे-वाड्यांमधील ५१,३९४ ग्रामस्थांना टॅंकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे.
जिल्ह्यावर सध्या अवकाळी पावसाचे संकट दाटले असले तरी मागील काही दिवसांपासून तापमानाच्या पाऱ्यात मोठी वाढ झाली आहे. वाढत्या तापमानासोबत ग्रामीण भागात पाण्याचे दुर्भिक्ष जाणवायला सुरुवात झाली आहे. गावोगावीचे नैसर्गिक स्रोत आटल्याने पाण्यासाठी गावकऱ्यांवर भटकंती करायची वेळ आली आहे. त्यामुळे गावकऱ्यांच्या हालअपेष्टा कमी करण्यासाठी प्रशासनाकडून टँकरच्या सहाय्याने पाणीपुरवठा केला जातोय.
येवला तालुक्याला सर्वाधिक टंचाईच्या झळा बसत आहेत. तालुक्यात २६ गावे-वाड्यांना १३ टँकरद्वारे पाणी पुरविले जात आहे. त्या खालोखाल मालेगावमध्ये पाच ठिकाणी चार टॅंकर सुरू आहेत. चांदवडला सहा गावांसाठी तीन, तर बागलाण व देवळ्यात प्रत्येकी एक टँकर धावतो आहे. टँकरसोबत गावांना पाणी पुरविण्यासाठी प्रशासनाने १० विहिरी अधिग्रहित केल्या आहेत. त्यात मालेगावच्या सात व देवळ्यातील तीन विहिरींचा समावेश आहे. दरम्यान, येत्याकाळात उन्हाच्या तीव्रतेसोबतच टॅंकरच्या संख्येतही वाढ होणार असल्याने त्यादृष्टीने प्रशासनाने नियोजन केले आहे.
जिल्ह्यातील टॅंकर
तालुका गावे टँकर
येवला 26 13
मालेगाव 04 04
चांदवड 06 03
बागलाण 02 01
देवळा 01 01
हेही वाचा :
- Nashik Crime : सोयाबीन चोरणाऱ्या दोघांना बेड्या
- …तर बाळही होईल तंदुरुस्त
- मुळशीतील छत्रपती शिवाजी महाराज तलाव कचर्याच्या विळख्यात
The post नाशिक : जिल्ह्यात ३९ गावे-वाड्यांना टंचाईच्या झळा, २२ टॅंकरच्या सहाय्याने पाणीपुरवठा appeared first on पुढारी.