नाशिक : पुढारी वृत्तसेवा; शासनाच्या मंत्रिमंडळ उपसमितीने गुरुवारी (दि.९) राज्यातील २६९ महसूल मंडळांमध्ये दुष्काळ घोषित केला आहे. नाशिक जिल्ह्यातील नाशिक, निफाड, नांदगाव, देवळा, कळवण, चांदवड व बागलाण या सात तालुक्यांतील ४६ मंडळांचा त्यात समावेश आहे. नाशिक जिल्हा संपूर्ण दुष्काळी घोषित करावा, अशी मागणी पालकमंत्री दादा भुसे यांनी शासनाकडे केली होती. अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांनीदेखील याबाबत शासन स्तरावर पाठपुरावा केला.
शासनाने आठवडाभरापूर्वी राज्यातील ४० तालुक्यांमध्ये दुष्काळ घोषित केला होता. या तालुक्यांत मालेगाव, सिन्नर व येवल्याचा समावेश करण्यात आला. पण अवर्षणग्रस्त नांदगाव, देवळा, चांदवड, निफाड यासह अन्य तालुक्यांतही दुष्काळीची स्थिती भयंकर असताना शासनाने या तालुक्यांचा विचारही न केल्याने सर्वत्र नाराजीचा सूर होता. वास्तविक जिल्हयात यंदा अतिशय कमी पर्जन्यमान झाले आहे. अनेक गावांमध्ये उशिरा पाऊस पडल्याने पेरणी लांबली. तसेच पेरणीनंतरही चार ते पाच आठवडे पावसाचा खंड पडल्याने दुबार पेरणीची वेळ शेतकऱ्यांवर ओढावली. त्यातच परतीच्या पावसाने पाठ फिरवल्याने कापूस, मका, कांदा, भुईमूग, ज्वारी इत्यादी पिके धोक्यात आली. तर पावसाअभावी ठिकठिकाणी टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. त्यामुळे सरसकट दुष्काळ जाहीर करावी, अशी मागणीदेखील सर्वत्र होत आहे.
पालकमंत्री भुसे यांनी बुधवारी (दि. ८) राज्याचे मदत व पुनर्वसनमंत्री अनिल पाटील यांच्याकडे पत्राद्वारे संपूर्ण जिल्हा दुष्काळी घोषित करावा, अशी मागणी केली होती. तर भुजबळ हेदेखील दुष्काळी जाहीर करावा यासाठी राज्यपातळीवर पाठपुरावा करत होते. अखेर शासनाने दुसऱ्या टप्प्यामध्ये सात तालुक्यांतील ४६ महसुली मंडळांमध्ये दुष्काळ घोषित केला आहे. त्यामुळे संबंधित मंडळातील जनतेला दुष्काळाच्या उपाययोजना लागू होणार असल्याने दिलासा मिळाला आहे.
ही आहेत महसुली मंडळे
निफाड : लासलगाव, देवगाव, नांदूरमधमेश्वर, निफाड, चांदोरी, रानवड, पिंपळगाव बसवंत, ओझर, सायखेडा
नांदगाव : नांदगाव, मनमाड, वेहेळगाव, जातेगाव, हिसवळ बुद्रूक
नाशिक : नाशिक, देवळाली, पाथर्डी, माडसांगवी, मखमलाबाद, शिंदे, सातपूर, गिरणारे
कळवण : कळवण, नवीबेज, मोकभणगी, कनाशी
बागलाण : सटाणा, नामपूर, ताहाराबाद, जायखेडा, वीरगाव, मुल्हेर, डांगसौंदाणे, ब्राह्मणगाव
चांदवड : चांदवड, रायपूर, दुगाव, वडनेर भैरव, वडाळीभोई, दिघवद,
देवळा : देवळा, लोहणेर, उमराणे
दिंडोरी : दिंडोरी, माेहाडी, वरखेड
हेही वाचा :
- खासदार, आमदारांवरील खटले तत्काळ निकाली काढा : सरन्यायाधीश चंद्रचूड
- PM Modi : काँग्रेसला सत्तेपासून 100 वर्षे दूर ठेवा : पंतप्रधान नरेंद्र मोदी
- कोल्हापूर : शाहूवाडी तालुक्यात सापडल्या ३ हजार ६६२ ‘कुणबी नोंदी’
The post नाशिक जिल्ह्यात ४६ महसुली मंडळ दुष्काळी...! appeared first on पुढारी.