नाशिक जिल्ह्याला अवकाळीचा तडाखा, २६८५ हेक्टरचे नुकसान

नाशिक अवकाळीचा तडाखा,www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

जिल्ह्याला रविवारी (दि. ५) मध्यरात्री वादळी वारे व विजांच्या कडकडाटासह आलेल्या अवकाळी पावसाने तडाखा दिला. पावसाचा सर्वाधिक फटका शेतीपिकांना बसला आहे. जिल्हा प्रशासनाच्या प्राथमिक अहवालानुसार चार तालुक्यांतील १९१ गावांमधील २,६८५.३५ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले आहे. गहू, कांदा, द्राक्षपिकांना सर्वाधिक तडाखा बसला. हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून नेल्याने बळीराजाच्या डोळ्यात अश्रू तरळले आहे.

हिमालयामधून येणाऱ्या पश्चिमी चक्रावातामुळे तसेच आग्नेय व दक्षिण भारताकडून वाहणाऱ्या वाऱ्यांचा वेग अधिक असल्यामुळे राज्यात ढगाळ हवामान निर्माण झाले आहे. गेल्या दोन दिवसांपासून नाशिक जिल्ह्यात ढगाळ वातावरणासह अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. त्यातही रविवारी (दि. ५) मध्यरात्री दोनच्या सुमारास झालेल्या पावसाने अक्षरश: झोडपून काढले. सकाळपर्यंत त्याचा जोर कायम होता. नाशिक शहर व परिसरात वादळी वाऱ्यासह झालेल्या मुसळधार पावसाने अर्धाअधिक शहराचा वीजपुरवठा खंडित झाला. हवेत गारवा निर्माण होऊन नाशिककरांना दिलासा मिळाला. सकाळी ८ पर्यंत शहरात ९ मिमी पर्जन्याची नोंद झाली.

नाशिक, त्र्यंबकेश्वर, निफाड, कळवणला सर्वाधिक फटका

जिल्ह्याच्या ग्रामीण भागांतही सर्वदूर पावसाने हजेरी लावली. मात्र, त्यातही नाशिक, त्र्यंबकेश्वर, निफाड आणि कळवण या चार तालुक्यांना सर्वाधिक फटका बसला आहे. या चारही तालुक्यात गेल्या ४८ तासांत झालेल्या पावसामुळे २ हजार ६८५.३५ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. सर्वाधिक फटका गव्हाला बसला असून, तब्बल १८०३.३० हेक्टरवरील पिक पाण्यात गेली आहेत. त्याखालोखाल ७७७ हेक्टरवरील काढणीला आलेले द्राक्षपीक बाधित झाले आहे. याशिवाय ६१.५० हेक्टर कांदा, साडेतीन हेक्टर टोमॅटो, ०.१० हेक्टर बाजरी, ३७.१५ हेक्टरवरील भाजीपाला तसेच २.८० हेक्टरवरील आंबा पिकांचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती आहे. त्यामुळे २ हजार ७९८ शेतकरी बाधित झाले आहेत. नुकसानीचे पंचनामे तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाने तहसील व कृषी विभागाला दिल्या आहेत. परिणामी नुकसानीचे आकडे वाढण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

चार जनावरे दगावली
जिल्ह्यात अवकाळी पावसाने चार दुधाळ जनावरे दगावली आहेत. नांदगाव येथे प्रत्येकी १ गाय व म्हैस गतप्राण झाली. दिंडोरी व निफाडमध्येही एक गाय पावसाची बळी ठरल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली.

अवकाळीचे नुकसान
बाधित गावे : १९१
बाधित शेतकरी : २७९८
एकूण क्षेत्र : २६८५.३५
बागायती क्षेत्र : १९०५.५५
बहुवार्षिक फळपिके : ७७९.८०

हेही वाचा : 

The post नाशिक जिल्ह्याला अवकाळीचा तडाखा, २६८५ हेक्टरचे नुकसान appeared first on पुढारी.