नाशिक जिल्ह्याला दोन मंत्रिपदे मिळण्याची शक्यता, राजकीय चर्चांचा रंगतोय फड

दादा भुसे, सुहास कांदे

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
महाविकास आघाडी सरकारमधील शिवसेनेच्या फुटलेल्या शिंदे गटामुळे सरकार कोसळले. शिंदे गटाने भाजपबरोबर एकत्रित सरकार स्थापन केल्यामुळे नाशिकला दोन मंत्रिपदे मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. भाजपमधील दोन आणि शिंदे गटाच्या दोन या चार आमदारांपैकी दोघा आमदारांची वर्णी मंत्रिपदावर लागण्याची दाट शक्यता वर्तविली जात आहे.

शिवसेनेतून फुटून बाहेर पडलेल्या एकनाथ शिंदे यांच्या गटामध्ये सुरुवातीपासूनच नाशिक जिल्ह्यातील नांदगाव मतदारसंघाचे शिवसेनेचे आमदार सुहास कांदे सहभागी झाले आणि त्यानंतर मालेगाव बाह्य मतदारसंघाचे आमदार दादा भुसेदेखील शिंदे गटामध्ये सामील झाले. या दोन्ही आमदारांची स्वत:ची ताकद आणि कार्यकर्ते सांभाळण्याची हातोटी पाहता राज्यात विविध ठिकाणी बंडखोरी करणार्‍या आमदारांविरोधात मोर्चा, निदर्शने होत असताना नाशिक शहर व जिल्हा त्यास अपवाद ठरला. नाशिक शहरात शिवसेनेचा मोर्चा निघाला तो पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना पाठिंबा दर्शविण्यासाठी. सध्या या दोन्ही आमदारांपैकी दादा भुसे हे महाविकास आघाडीत कृषिमंत्री होते. त्यामुळे त्यांच्याकडे मंत्रिपदाची धुरा पुन्हा सोपविली जाऊ शकते. तर सुहास कांदे यांना एखाद्या विकास महामंडळाचे अध्यक्ष म्हणून संधी दिली जाऊ शकते. तर दुसरीकडे भाजपमधून सलग दोन वेळा विधानसभा निवडणुकीत विजयी झालेले देवळा येथील आमदार डॉ. राहुल आहेर आणि नाशिक शहर मध्य विधानसभा मतदारसंघाच्या आमदार प्रा. देवयानी फरांदे यांची नावे मंत्रिपदाकरता चर्चेत आहेत. फरांदे आणि आहेर हे दोन्ही आमदार अभ्यासू आणि निष्ठावान अशी ओळख आहे. यामुळे या दोन्हींपैकी कुणाच्या गळ्यात मंत्रिपद पडणार याकडे लक्ष लागून आहे. फरांदे सध्या भाजपच्या राज्य सरचिटणीसपदाची धुरा सांभाळत आहेत.

पालकमंत्री महाजन की अन्य कोणी?
आमदार गिरीश महाजन यांच्याकडे नाशिकचे पालकमंत्री म्हणून जबाबदारी होती. नाशिक मनपात पाच वर्षांपैकी नंतरच्या अडीच वर्षांत भाजपकडे सत्ता खेचून आणण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका निभावली होती. मूळचे जळगाव. त्यात जलसंपदामंत्र्याचा भार यामुळे त्यांना पूर्णवेळ नाशिककडे लक्ष देता आले नाही. त्यामुळे मध्यंतरी नाशिक महापालिकेत पदाधिकार्‍यांमधील अंतर्गत वाद उफाळून आला होता. त्यामुळे एकहाती सत्ता येऊनही भाजपला फारसे कर्तृत्व सिद्ध करता आले नाही. परंतु, निवडणुकीतील करिष्मा म्हणून महाजन मंत्री झालेच तर नाशिक महापालिकेच्या निवडणुकीच्या दृष्टीने महाजन यांच्याकडे पालकमंत्र्यांची सूत्रे जाऊ शकतात, असे राजकीय कयास बांधले जात आहेत.

The post नाशिक जिल्ह्याला दोन मंत्रिपदे मिळण्याची शक्यता, राजकीय चर्चांचा रंगतोय फड appeared first on पुढारी.