नाशिक जिल्ह्यावर पाणीटंचाईचे सावट, धरणांमध्ये अवघा ६६ टक्के जलसाठा

गंगापूर धरण,www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

आॅगस्टच्या अखेरच्या टप्प्यातही पावसाचा लहरीपणा कायम आहे. जिल्ह्याचे चित्र चिंताजनक आहे. दमदार पावसाअभावी धरणांमध्येही मर्यादित साठा आहे. जिल्ह्यातील प्रमुख धरणे ६६ टक्केच भरली आहेत. यामुळे पावसाची ओढ कायम राहिल्यास जिल्हावासीयांवरील पाणीटंचाईचे सावट अधिक गडद होणार आहे.

अल निनोमुळे यंदा मान्सूनवर विपरीत परिणाम झाला आहे. मान्सूनचे तीन महिने सरले तरीही अर्धा अधिक महाराष्ट्राला दमदार पावसाची प्रतीक्षा कायम आहे. नाशिक जिल्हाही त्याला अपवाद राहिलेला नाही. जिल्ह्यात आतापर्यंत वार्षिक सरासरीच्या केवळ ४५ टक्के पर्जन्याची नोंद झाली आहे. त्याचा फटका धरणांनाही बसला आहे. जिल्ह्यातील प्रमुख चोवीस धरणांमध्ये आजमितीस ४३ हजार ५७६ दलघफू इतका पाणीसाठा निर्माण झाला आहे. विशेष म्हणजे गेल्या वर्षी या कालावधीत धरणे ९४ टक्के भरलेली होती. तेव्हा एकूण उपयुक्त साठा ६१ हजार ९१३ दलघफू इतका होता.

जुलैच्या अखेरीस व चालू महिन्याच्या प्रारंभी झालेल्या थोड्याफार पर्जन्यामुळे धरणांच्या पाणीसाठ्यात काहीअंशी वाढ होण्यास मदत झाली आहे. मात्र, गेल्या पंधरवड्यापासून जिल्ह्यात पावसाने दडी मारल्याने पुन्हा एकदा चित्र अधिक चिंताजनक झाले आहे. दरम्यान, चालू वर्षी आतापर्यंत मान्सूनने अपेक्षाभंग केला असला तरी सप्टेंबरमध्ये परतीचा पाऊस चांगला होईल, असा अंदाज वर्तविला जातोय. पण, पावसाचा लहरीपणा कायम राहिल्यास पाण्याची समस्या अधिक भयावह होणार आहे.

दारणाच्या विसर्गात वाढ

इगतपुरीमध्ये दोन दिवसांच्या पावसाने दारणातील आवक वाढली आहे. धरणाचा साठा ९६ टक्के झाल्याने रविवारी (दि.२७) त्याच्या विसर्गात ३०२० क्यूसेकपर्यंत वाढ करण्यात आली. याशिवाय पुणेगाव १५०, भावलीतून १३५, वालदेवीतूुन ६५, हरणबारीतून १७३ व केळझरमधून ४५ क्यूसेक विसर्ग नदीपात्रात केला जातोय. एकीकडे सहा धरणांतून विसर्ग केला जात असताना तिसगाव, नागासाक्या व माणिकपुंज कोरडेठाक पडले आहेत.

धरणसाठा (दलघफूमध्ये)

गंगापूर 5140, दारणा 6853, काश्यपी 1113, गाैतमी गोदावरी 1091, आळंदी 670, पालखेड 333, करंजवण 3346, वाघाड 1851, ओझरखेड ९०३, पुणेगाव 548, भावली 1434, मुकणे 5604, वालदेवी 1133, कडवा 1392, नांदूरमध्यमेश्वर 257, भोजापूर 235, चणकापूर 2139, हरणबारी 1166, केळझर 572, पुनद 920.

हेही वाचा :

The post नाशिक जिल्ह्यावर पाणीटंचाईचे सावट, धरणांमध्ये अवघा ६६ टक्के जलसाठा appeared first on पुढारी.