नाशिक जिल्‍ह्यात कोरोनाचे चोवीस बळी; दिवसभरात ४ हजार १२२ पॉझिटिव्‍ह 

नाशिक : जिल्‍ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढत चालला असून, बुधवारी (ता.७) दिवसभरात २४ बाधितांचा कोरोनामुळे मृत्‍यू झाला आहे. तर ४ हजार १२२ रुग्‍णांचा अहवाल पॉझिटिव्‍ह आला आहे. बरे झालेल्‍या रुग्‍णांची संख्या ३ हजार ८५६ इतकी होती. यातून ॲक्‍टिव्‍ह रुग्‍ण संख्येत वाढ झाली असून, सद्यःस्‍थितीत जिल्‍ह्‍यात ३२ हजार ४१० बाधितांवर उपचार सुरु आहेत. 

बुधवारी झालेल्‍या चोवीस मृतांमध्ये नाशिक शहरातील अकरा, नाशिक ग्रामीणमधील नऊ तर जिल्‍हा बाहेरील तब्‍बल चार बाधितांचा उपचारादरम्‍यान मृत्‍यू झाला आहे. नाशिक ग्रामीणच्‍या मृतांमध्ये सटाणा, निफाड, चांदवड, इगतपुरी, दिंडोरी, नांदगाव तालुक्‍यातील प्रत्‍येकी एक तर सिन्नरच्‍या दोन बाधितांचा मृत्‍यू झाला आहे. जिल्‍हा बाहेरील नगर, जळगाव व नंदुरबारच्‍या प्रत्‍येकी एका बाधिताचा कोरोनाने बळी घेतला आहे. दिवसभरात आढळलेल्‍या बाधितांमध्ये नाशिक शहरातील २ हजार ३७९, नाशिक ग्रामीणमधील १ हजार ५५८, मालेगाव महापालिका क्षेत्रातील ९३, तर जिल्‍हा बाहेरील ९२ बाधितांचे अहवाल पॉझिटिव्‍ह आले आहेत. यातून जिल्‍ह्‍यातील कोरोना बाधितांची एकूण संख्या २ लाख ११ हजार ७८६ वर पोहोचली आहे. यापैकी १ लाख ७६ हजार ८२३ रुग्‍णांनी कोरोनावर यशस्‍वीरीत्‍या मात केली आहे. आत्तापर्यंत २ हजार ५५३ बाधितांचा कोरोनामुळे बळी गेला आहे. 

हेही वाचा - नांदगाव हत्याकांडाचे गुढ अखेर उलगडले! नऊ महिने अन् दिडशे जबाबानंतर पोलिसांना यश

सायंकाळी उशीरापर्यंत ४ हजार ६२३ रुग्‍णांना अहवालाची प्रतिक्षा होती. यापैकी नाशिक शहरातील ९३६, नाशिक ग्रामीणमधील ३ हजार २७२, तर मालेगाव क्षेत्रातील ४१५ रुग्‍णांना अहवालाची प्रतिक्षा कायम होती. दिवसभरात ३ हजार आठशे संशयित रुग्‍ण जिल्‍हाभरातील रुग्‍णालये व गृहविलगीकरणात दाखल झाले होते. यापैकी ३ हजार ४०६ रुग्‍ण नाशिक महापालिका क्षेत्रातील आहेत. तर जिल्‍हा रुग्‍णालयातील सहा, डॉ.वसंत पवार वैद्यकीय महाविद्यालयातील २७ रुग्‍णांचा समावेश आहे.  

हेही वाचा - जेव्हा लसीकरण केंद्रावर पोचला 'कोरोनाबाधित'..! उपस्थितांमध्ये पळापळ आणि खळबळ