नाशिक : जि.प. शिक्षण विभागाच्या सायकलींना नियोजन विभागाकडूनच ब्रेक

जिल्हा परिषद सायकल www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षण विभागातर्फे मानव विकास मिशन अंतर्गत गरीब विद्यार्थ्यांना सायकली पुरविण्यात येतात. माध्यमिक शिक्षण विभागाची सायकल वाटप संदर्भातील फाइल ही नियोजन विभागाकडे निधी मंजुरीसाठी वर्ग करण्यात आली आहे. सध्या 5 हजार 486 सायकल वाटप प्रस्तावित असून, जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन विभागाकडून निधी प्राप्तीच्या प्रतीक्षेत असल्याचे समजते. यामुळे शिक्षण विभागाच्या सायकलींना नियोजन विभागाकडूनच ब्रेक लागला की काय, अशीच चर्चा होत आहे.

दरम्यान, जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षण विभागातर्फे देण्यात येणार्‍या सायकली या मानव विकास मिशन अंतर्गत देण्यात येत असतात. ज्या ठिकाणी घर ते शाळा हे अंतर 5 किलोमीटर असेल किंवा दुर्गम भागात शाळेत जाण्यासाठी सुविधा नसेल त्या ठिकाणच्या लाभार्थीनींना (मुली) सायकल वाटप करण्यात येते. माध्यमिक शिक्षण विभागातर्फे सायकल वाटपसाठी देण्यात येणारे अनुदान हे गटविकास अधिकार्‍यांकडे देण्यात येते. गटविकास अधिकार्‍याकडून गटशिक्षणाधिकार्‍यांमार्फत विद्यार्थिनीच्या खात्यावर वर्ग करण्यात येते. या योजनेंतर्गत लाभार्थी विद्यार्थिनीला सायकल खरेदीसाठी अगोदर 3,500 रुपये खात्यावर वर्ग करण्यात येतात. सायकल खरेदीनंतर आवश्यक कागदपत्रे गटशिक्षणाधिकार्‍यांकडे जमा केल्यानंतर उर्वरित 1,500 रुपये लाभार्थ्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात येतात. पहिल्या टप्प्यात एकूण 8 तालुक्यांतील यात सुरगाणा, त्र्यंबकेश्वर, पेठ, इगतपुरी, कळवण, दिंडोरी, बागलाण, नांदगाव या ठिकाणी सप्टेंबर 2022 मध्ये सायकल वाटप करण्यात आले. प्रत्येक तालुक्यात प्रत्येकी 400 लाभार्थ्यांची यासाठी निवड करण्यात आली. यामध्ये कळवण आणि दिंडोरी या ठिकाणी ग्रामपंचायत निवडणूक असल्याने सायकल वाटप स्थगित करण्यात आले होते. तर दुसर्‍या टप्प्यात कळवण, दिंडोरीसहीत त्र्यंबक 377, सुरगाणा 262, पेठ 472, इगतपुरी 526, कळवण 1 हजार 115 (पहिल्या टप्प्यातील 400 सह), दिंडोरी 1 हजार 039 (पहिल्या टप्प्यातील 400 सह), बागलाण 931, नांदगाव 764 असे एकूण 5 हजार 486 लाभार्थ्यांना सायकल वाटप प्रस्तावित आहे.

हेही वाचा:

The post नाशिक : जि.प. शिक्षण विभागाच्या सायकलींना नियोजन विभागाकडूनच ब्रेक appeared first on पुढारी.