Site icon

नाशिक : जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी देवळ्यात संपकऱ्यांचा एल्गार

नाशिक (देवळा) : पुढारी वृत्तसेवा

जुनी पेन्शन योजना पुन्हा लागू करण्यात यावी तसेच सरकारी कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी मंगळवार (दि.14) राज्यातील तब्बल १९ लाख सरकारी कर्मचाऱ्यांनी एल्गार पुकारला आहे.

देवळा येथे सरकारी कर्मचाऱ्यांनी एल्गार पुकारत राज्यव्यापी संपाला पाठींबा दर्शवला. येथील शिवतीर्थावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून आंदोलनास प्रारंभ करण्यात आला. तीव्र घोषणाबाजी करत जुनी पेन्शन देणाऱ्यांच्यामागे आम्ही राहू, अन्यथा हिसका दाखविल्याशिवाय राहणार नाही असा इशारा यावेळी शासकीय कर्मचाऱ्यांनी दिला. आमदारांना पेन्शन मिळते, मग आम्हाला का नाही यांसह ‘कोण म्हणतंय देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही, एकच मिशन, जुनी पेन्शन, वोट फॉर ओपीएस, पेन्शन द्या, नाही तर टेन्शन देऊ’ अशा आवेशपूर्ण घोषणा यावेळी कर्मचाऱ्यांनी दिल्या. जुनी पेन्शन घेणारे कर्मचारी, काही महिला कर्मचारी मुलांसह, प्रत्येकाच्या डोक्यावर टोपी व एकच मिशन जुनी पेंशन अशी घोषणा ऐकायला मिळाली. यावेळी देवळा येथील तहसीलदार विजय सूर्यवंशी व पोलीस निरीक्षक समीर बारवरकर यांना विविध संघटनाच्या वतीने मागण्यांचे निवेदन देण्यात आले. आंदोलनस्थळी पाठींबा दर्शविण्यासाठी कृषी, शिक्षण, जिल्हा परिषद, सार्वजनिक बांधकाम, माध्यमिक शिक्षक, आदिवासी विकास विभागातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आदी खात्यांतील कर्मचाऱ्यांनी सहभाग नोंदवला आहे.

विविध संघटनांचा पाठींबा
जुन्या पेन्शनसाठी आंदोलन करणाऱ्या कर्मचाऱ्यांना माध्यमिक शिक्षक संघ, टीडीएफ, मुख्याध्यापक संघ, शिक्षकेतर कर्मचारी संघ, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती , महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ, महाराष्ट्राचे अपंग कर्मचारी संघटना, शिक्षक भारती, माध्यमिक शिक्षक संघटना, लोकशाही शिक्षक आघाडी,ग्रामसेवक युनियन ,लिपिक वर्गीय संघटना, परिचर संघटना , शिक्षकेतर कर्मचारी संघटना, जिल्हा परिषद महासंघ अंतर्गत येणाऱ्या सर्व संघटना, पदवीधर शिक्षक संघटना आदींनी पाठींबा जाहीर केला आहे.

हेही वाचा:

The post नाशिक : जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी देवळ्यात संपकऱ्यांचा एल्गार appeared first on पुढारी.

Exit mobile version