Site icon

नाशिक : जुन्या पेन्शनसाठी हजारो कर्मचारी रस्त्यावर

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
जुनी पेन्शन लागू करावी या प्रमुख मागणीसाठी नाशिकमध्ये हजारो शासकीय कर्मचारी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी गुरुवारी (दि.16) रस्त्यावर उतरले. शहरातून मोर्चा काढत या कर्मचार्‍यांनी एकजूट दाखवून दिली. यावेळी पेन्शन आमच्या हक्काची, नाही कोणाच्या बापाची, एकच मिशन, जुनी पेन्शन अशा घोषणा दिल्या. मोर्चानंतर जिल्हा प्रशासनामार्फत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विविध मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले.

राज्यातील शासकीय कर्मचार्‍यांनी जुन्या पेन्शनसाठी एल्गार पुकारला आहे. या प्रमुख मागणीसाठी कर्मचार्‍यांनी तीन दिवसांपासून बेमुदत संप सुरू केला आहे. त्यामुळे सर्वच शासकीय यंत्रणा ठप्प पडल्या आहेत. या संपादरम्यान, नाशिकमध्ये राज्य सरकारी, जिल्हा परिषद-निमसरकारी, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी, चतुर्थश्रेणी, कंत्राटी कर्मचारी व जुनी पेन्शन हक्क संघटना जिल्हा समन्वय समितीच्या माध्यमातून मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात हजारो कर्मचारी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्‍यांनी सहभागी होत शासनाविरोधात जोरदार निदर्शने केली. गोल्फ क्लब येथून काढण्यात आलेल्या मोर्चात विविध विभागांचे हजारो कर्मचारी सहभागी झाले. हा मोर्चा पुढे जिल्हा परिषद, गंजमाळ, शालिमारमार्गे डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा येथे आल्यानंतर त्याचा समारोप करण्यात आला. यावेळी मोर्चातील पदाधिकार्‍यांनी मार्गदर्शन केले. तसेच जुनी पेन्शन लागू होत नाही, तोपर्यंत आता माघार नाही, असा निर्धार यावेळी मोर्चेकर्‍यांनी केला. त्यानंतर शिष्टमंडळाने जिल्हा प्रशासनाला मागण्यांचे निवेदन दिले. मोर्चामध्ये समन्वय समितीचे निमंत्रक अरुण आहेर, शिक्षक समितीचे काळूजी बोरसे, सीटूचे राज्य उपाध्यक्ष डॉ. डी. एल. कराड, आयटकचे राज्य सचिव राजू देसले, आर. डी. तिदमे, मोहन चकोर, दिलीप थेटे, वैभव गर्गे, बाबासाहेब ढोबळे, राजेश राजवाडे, पूजा पवार, भरत पटेल, लता पाटील यांच्यासह विविध शासकीय कर्मचारी संघटनांचे पदाधिकारी व निरनिराळे विभागांचे कर्मचारी सहभागी झाले.

वाहतुकीचे तीन तेरा
शासकीय कर्मचारी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्‍यांनी काढलेल्या मोर्चामुळे शहरातील वाहतुकीचे तीन तेरा वाजले. त्र्यंबक नाका, शालिमार, सीबीएस, अशोकस्तंभ आदी परिसरात त्यामुळे वाहतूक कोंडी निर्माण झाली. त्यामुळे कामावर निघालेल्या सर्वसामान्य नाशिककरांना त्याचा नाहक त्रास सहन करावा लागला.

फलकांनी वेधले लक्ष
मोर्चात सहभागी कर्मचार्‍यांनी डोक्यावर एकच मिशन, जुनी पेन्शन मजकूर असलेल्या गांधी टोप्या परिधान केल्या. तसेच महिला कर्मचार्‍यांनीही विविध मागण्यांचे फलक हाती घेतले. काही कर्मचार्‍यांनी त्यांच्या शर्टवर मागण्यांचा मजकूर लिहिलेला होता. या सर्व मागण्यांकडे नाशिककरांचे लक्ष वेधले गेले.

मोर्चात अपंग संघटना देखील सहभागी
जुनी पेन्शन योजनेसाठी गोल्फ क्लब मैदानावरून काढण्यात आलेल्या मोर्चात अपंग कर्मचारी, अधिकारी संघटनेने सक्रिय सहभाग नोंदविला. या मोर्चात विविध संघटनांचे पदाधिकारी, कर्मचारी सहभागी झाले होते. मागण्या मान्य होईपर्यंत मोर्चाला पाठिंबा असेल, अशी माहिती विभागीय अध्यक्ष बाळासाहेब सोनवणे यांनी दिली. दरम्यान संघटनेचे राज्य सचिव ललित सोनवणे, बाळासाहेब सोनवणे, जुनी पेन्शन हक्क संघटनेचे सिन्नर तालुका पदाधिकारी राजू सानप, माणिकराव सानप, खंडेराव सानप, सुरेश कापडणीस, सतीश लाड, गणेश घारे, मनोहर नेटावटे, दत्ता ठाणगे, शिवाजी जाधव, बाळासाहेब सानप, संदीप ओहोळ, संतोष तांबे आदी मोर्चात सहभागी झाले होते.

जुन्या पेन्शनसाठी निफाडलाही निदर्शने
जुनी पेन्शन योजना लागू करण्याच्या मागणीसाठी निफाड येथील गहू विशेषज्ञ कृषी संशोेधन केंद्रातील अधिकारी व कर्मचार्‍यांनी गुरुवारी (दि. 16) केंद्राच्या प्रवेशद्वारासमोर निदर्शने केली. राज्य सरकारी, निमसरकारी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी संघटनेने पुकारलेल्या संपामध्ये कृषी विद्यापीठ शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी समन्वय संघटना सहभागी झाली आहे. त्यानुसार निफाडच्या केंद्रामधील सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी उत्स्फूर्त सहभाग घेत जुन्या पेन्शनसाठी घोषणा दिल्या.

हेही वाचा:

The post नाशिक : जुन्या पेन्शनसाठी हजारो कर्मचारी रस्त्यावर appeared first on पुढारी.

Exit mobile version