Site icon

नाशिक : जोपूळ येथील सरपंचाच्या द्राक्षबागेतील 80 झाडे तोडली, शेतीसाहित्याचीही चोरी

 दिंडोरी (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा

तालुक्यातील जोपूळ येथील सरपंच माधव उगले यांच्या द्राक्षबागेचे समाजकंटकांनी मध्यरात्री मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे. तसेच शेतीसाहित्याचीही चोरी करण्यात आली आहे.

याबद्दल माहिती अशी की, जोपूळचे सरपंच माधव उगले यांची जोपूळ-पिंपळगाव मार्गावर जोपूळ शिवारात द्राक्षबाग आहे. काही समाजकंटकांनी 20 मेच्या मध्यरात्रीच्या सुमारास उगले यांच्या द्राक्षबागेत कुऱ्हाडीने घाव घालून मोठ्या प्रमाणात झाडे तोडली. तसेच द्राक्षबागेतील पावडर मारण्याचे ब्लोअर मशीनचे आठ पितळी फुले तसेच सूर्या कंपनीचा 100 किलो वजनाचा वजन काटा असा सुमारे ७५ हजारांचा मुद्देमालही चोरून नेला.

गेल्या आठ दिवसांपूर्वीदेखील माधव उगले यांच्या द्राक्षबागेतील काही द्राक्षांची झाडे तोडून मोठ्या प्रमाणात नासधूस केली होती. त्यानंतर पुन्हा आठवड्याच्या कालावधीनंतर हे नुकसान करण्यात आले. बागेतील 80 द्राक्षांची झाडे जमिनीपासून सुमारे चार ते पाच इंचावर तोडून सुमारे 25 हजार रुपये किमतीचे नुकसान केले आहे. उगले यांनी तत्काळ वणी पोलिस ठाण्याला माहिती देऊन तक्रार अर्ज दाखल केला. वणीचे सहायक पोलिस निरीक्षक नीलेश बोडके यांनी भेट देऊन घटनास्थळाची पाहणी केली. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा :

The post नाशिक : जोपूळ येथील सरपंचाच्या द्राक्षबागेतील 80 झाडे तोडली, शेतीसाहित्याचीही चोरी appeared first on पुढारी.

Exit mobile version