नाशिक : ज्येष्ठांसाठी शहरात विरंगुळा केंद्र तयार करावे; जिल्हाप्रमुख अजय बोरस्ते यांच्या मागणीला राज्यस्तरावर मंजुरी

अजय बोरस्ते www.pudhari.news

नाशिक : पुढारी ऑनलाईन डेस्क

राज्याचे उपमुख्यमंत्री महाअर्थसंकल्प 2023-24 मांडत असतांना त्यांनी पालिका क्षेत्रात ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्र उभारणार असल्याची घोषणा केली आहे. गेल्या महिन्यातच बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे जिल्हाप्रमुख अजय बोरस्ते यांनी शहरात ठिकठिकाणी ज्येष्ठांसाठी विरंगुळा केंद्र तयार करण्याची मागणी मनपा आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांच्याकडे केली होती. एकप्रकारे नाशिकच्या मागणीला राज्यस्तरावरच मान्यता मिळाली आहे.

नाशिकच्या अंदाजपत्रकात दलित वस्ती सुधार योजनेसह महिला बालकल्याण आणि क्रीडा यासाठी निधी राखीव ठेवणे बंधनकारक आहे. मात्र अंदाजपत्रकातील ही तरतूद अन्यत्र विभागांकडे वळविली जाते. त्यामुळे यापुढील काळात तसे होऊ नये यासाठी लक्ष घालावे, अशी सूचना करत बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे जिल्हाप्रमुख अजय बोरस्ते यांनी शहरात ठिकठिकाणी ज्येष्ठांसाठी विरंगुळा केंद्र तयार करण्याची मागणी मनपा आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांच्याकडे फेब्रुवारी-2023 मध्ये केली होती. राज्य शासनाच्या अंदाजपत्रक नियमानुसार 20 टक्के राखीव निधी ठेवणे बंधनकारक आहे. त्यानुसार दलित वस्त्यांचा विकास, महिला बालकल्याण, विविध प्रशिक्षण या घटकांसाठी प्रत्येकी पाच टक्के निधी राखीव ठेवला जातो. परंतु, गेली अनेक वर्षे या निधीची पळवापळवी केली जात असल्याने संबंधित चारही घटक दुर्लक्षित राहात असल्याची बाबही बोरस्ते यांनी आयुक्तांच्या निदर्शनास आणून दिली. नाशिक शहरात 159 वस्त्या असून, या वस्त्यांमधील ज्येष्ठांसाठी विरंगुळा केंद्रे निर्माण झाली पाहिजेत. विरंगुळा केंद्रात तसेच शहरातील विविध जॉगिंग ट्रॅकच्या ठिकाणी केवळ ज्येष्ठ नागरिकांना बसण्यासाठी आकर्षक बेंचेस बसवली पाहिजेत. अशी बोरस्ते यांनी निवेदनाव्दारे मागणी केली होती.

हेही वाचा:

The post नाशिक : ज्येष्ठांसाठी शहरात विरंगुळा केंद्र तयार करावे; जिल्हाप्रमुख अजय बोरस्ते यांच्या मागणीला राज्यस्तरावर मंजुरी appeared first on पुढारी.