नाशिक झाले भगवेमय! शिवजयंतीची जय्यत तयारी; चौकाचौकांमध्ये होर्डिंग 

म्हसरूळ (जि.नाशिक) : शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर पंचवटी परिसर भगवामय झाला असून, शिवजन्मोत्सवाची तयारी जोरात सुरू आहे. शिवजन्मोत्सव समित्यांची स्थापना करण्यात आली आहे. प्रामुख्याने परिसरातील चौकाचौकांमध्ये होर्डिंग लावण्यावर भर दिला आहे. त्यात येत्या महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने पूर्वतयारी करणारे अनेक इच्छुक झळकत आहेत. 

शिवजयंतीची जय्यत तयारी; चौकाचौकांमध्ये होर्डिंग 
पंचवटी जन्मोत्सव समितीने सर्वांना सोबत घेऊन शिवजन्मोत्सव करण्याची घोषणा समिती स्थापनेवेळी केली होती. समितीच्या पदाधिकाऱ्यांच्या सत्कारप्रसंगी याच विषयावर भर दिला होता. समितीतर्फे पंचवटी कारंजा येथील शिवपुतळ्याजवळ स्टील, लाकूड आणि फायबरचा वापर करून ६५ फूट उंचीचा किल्ला उभारण्यात येत आहे. किल्ल्यावर जाण्यासाठी लाकडी पायऱ्यांची व्यवस्था करण्यात येत आहे. शिल्पकार आनंद सोनवणे व विवेक सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रतीकात्मक किल्ला उभारण्याचे काम सुरू आहे. 

अवघा पंचवटी परिसर भगवामय
पंचवटी कारंजाप्रमाणेच मालेगाव स्टँड, पेठ रोड, फुलेनगर, नांदूर- मानूर, मेरी- म्हसरूळ, आडगाव, मखमलबाद येथेही शिवजयंतीची तयारी सुरू आहे. या वर्षीच्या शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर होर्डिंगबाजीवर सर्वाधिक भर दिसत आहे. त्यामुळे आठ दिवसअधीच पंचवटीतील बहुतांश चौक होर्डिंगने भरले आहेत. चौकाचौकांमध्ये भगवे ध्वज लावल्याने अवघा पंचवटी परिसर भगवामय झाला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निर्बंध येणार असून, शिवजयंती जोरदार साजरी करण्याच्या तयारीत असलेल्यांमध्ये नाराजीचा सूर आहे. काहींनी रक्तदान शिबिरासारखे उपक्रम राबविण्याचे ठरविले आहे. 

हेही वाचा - दोन वर्षांपासून बेपत्ता प्रेमीयुगुलाचा दुर्दैवी शेवट! 'व्हॅलेंटाईन डे'पुर्वी झोपडीत आढळले मृतदेह

कृषिमंत्र्यांनी दिली भेट 
पंचवटी शिवजन्मोत्सव समितीतर्फे उभारण्यात येणाऱ्या प्रतीकात्मक किल्ला उभारण्याच्या कामाच्या ठिकाणी रविवारी (ता. १४) सकाळी कृषिमंत्री दादा भुसे यांनी भेट देऊन पाहणी केली. कोरोनाचा अद्याप समूळ नायनाट न झाल्याने शासनाच्या नियमांचे पालन करून शिवजन्मोत्सव साजरा करावा, असे आवाहन मंत्री भुसे यांनी केले. समितीचे अध्यक्ष बाबासाहेब राजवाडे, उपाध्यक्ष दिगंबर मोगरे, सतनाम राजपूत, कार्याध्यक्ष उल्हास धनवटे, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. 

हेही वाचा -  नाशिकच्या शासकीय रुग्णालयातून दीड वर्षाच्या चिमुरडीला पळविले; घटना CCTV मध्ये.

 

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने शिवजयंतीसाठी जाहीर केलेल्या नियमांचे पालन करून सोहळा साजरा होणार आहे. मिरवणूक रद्द करून रक्तदान शिबिर होणार आहे. नागरिकांनीही नियमांचे पालन करून शिवजन्मोत्सव कार्यक्रमात सहभागी व्हावे. -बाबासाहेब राजवाडे, अध्यक्ष, पंचवटी शिवजन्मोत्सव समिती