नाशिक : ञ्यंबकेश्वरला नियोजनाअभावी भाविकांसह नागरिकांचे हाल, अधिकमासात कसं होणार?

त्रंबकेश्वर,www.pudhari.news

ञ्यंबकेश्वर : पुढारी वृत्तसेवा 

मंगळवारपासून अधिक श्रावण मास प्रारंभ होत आहे. यात्रेकरू भाविकांचा ओघ वाढलेला असेल मात्र यासाठी पूर्व नियोजन करण्यात नगर परिषद प्रशासन आणि देवस्थान ट्रस्ट उदासीन असल्याचे शहरात असलेल्या गोंधळात गोंधळ परिस्थितीने निदर्शनास येत आहे. याबाबत साधु महंत संतप्त झाले असून जिल्हा प्रशासनाने याकडे लक्ष घालावे अशी मागणी केली आहे.

ञ्यंबकेश्वर येथे मागच्या काही महिन्यांपासून भाविकांच्या गर्दीत दिवसोंदिवस वाढ होत आहे. भाविकांच्या प्रवासी वाहनांना शहरात उभे राहण्यास देखील जागा शिल्लक नसते. वाहनतळाबाबत नियोजन करण्यात नगर परिषद प्रशासनाला अपयश आले आहे. नागरिकांनी वारंवार मागणी करून देखील याबाबत डोळेझाक करण्यात येत आहे. मंदिराच्या समोर गर्दीचे नियमन करण्याबाबत दोन्ही संस्थांचे प्रशासन कानावर हात ठेवत आहे.

ञ्यंबक नगरपरिषद व देवस्थान ट्रस्ट यांच्यात समन्वय साधण्यासाठी माननीय उच्च न्यायालयाने नगर परिषद मुख्याधिकारी यांना देवस्थन ट्रस्टचे पदसिध्द सचिवपद बहाल केले आहे. तथापि रहदारीसह एकुण सर्व नियोजनाचा बोजवारा उडालेला असतांना दोन्ही संस्था परस्परांकडे बोट दाखवत असल्याचे चित्र आहे. अधिक श्रावण आणि नंतर मुख्य श्रावण असा सलग 60 दिवसांचा पर्वकाल आहे. यासाठी जिल्हा प्रशासनाने नगर परिषद आणि देवस्थान ट्रस्ट यांची बैठक घेऊन पूर्व नियोजन करण्याची आवश्यकता होती; मात्र तसे झाले नाही. दोन महिन्यांसाठी मांस आणि मद्य विक्री दुकाने बंद ठेवण्याची वारंवार मागणी करण्यात आली मात्र त्याबाबत ठोस निर्णय घेतलेला नाही.

व्हिआयपी दर्शनावर मर्यादा हवी

व्हिआयपी दर्शनाच्या नावाने येथे दररोज सर्वसामान्य भाविकांची कोंडी होत आहे.दोनशे रूपये देऊन देखील भाविकांना चार तास थांबावे लागते मात्र तथाकथीत व्हिआयपी थेट दर्शन घेतात.याबाबत नियम करण्यात यावेत तसेच वेळेची मर्यादा देखील निश्चीत करण्यात यावी अशी मागणी होत आहे.

ञ्यंबकेश्वर शहरात वाहनांची बेशीस्त पार्कींग रहदारीची कोंडी करत आहे. दर्शनाच्या नावाने सुरू असलेला गोंधळ सर्वसामान्य भाविकांना त्रासदायक ठरतो आहे. यामध्ये सुधारणा झाली नाही तर साधू आंदोलनाचा पावित्रा घेतील.

– महंत शंकरानंद सरस्वती महाराज,

कोषाध्यक्ष,अखिल भारतीय आखाडा परिषद.

हेही वाचा : 

The post नाशिक : ञ्यंबकेश्वरला नियोजनाअभावी भाविकांसह नागरिकांचे हाल, अधिकमासात कसं होणार? appeared first on पुढारी.