
नाशिक : पुढारी वृत्तसेवा
टाटा एआयजी विमा कंपनीच्या मदतीने भारतीय टपाल विभागाने गरीब आणि मध्यमवर्गासाठी आणलेल्या विमा योजनेला ग्राहकांचा वाढता प्रतिसाद मिळत आहे. अवघ्या 299 आणि 399 च्या वार्षिक हप्त्यामध्ये विमाधारकास 10 लाख रुपयांपर्यंत विमा संरक्षण मिळते. नाशिक जिल्ह्यात आतापर्यंत 19 हजार 466 ग्राहकांनी या योजनेंतर्गत विमा संरक्षण प्राप्त करून घेतले आहे. पोलिसांकडून या योजनेला विशेष पसंती मिळाली आहे.
भारतीय टपाल विभागाच्या विमा योजनेत व्यक्तीला अवघ्या 299 किंवा 399 रुपयांच्या हप्त्यामध्ये एका वर्षात 10 लाखांचे कवच मिळणार आहे. यामध्ये विमाधारकाचा अपघाती मृत्यू, अपंगत्व किंवा कायमचे आंशिक अपंगत्व असल्यास 10 लाख रुपयांपर्यंतचे संरक्षण दिले जाईल. सोबत रुग्णालयात दाखल झाल्यास 60 हजार रुपयांपर्यंतचा खर्च आणि रुग्णालयात दाखल न होता घरी उपचार घेतल्यास 30 हजार रुपयांपर्यंतचा दावाही दाखल करता येणार आहे. रुग्णालयाच्या खर्चासाठी 10 दिवसांसाठी प्रतिदिन एक हजार रुपये देण्यात येणार आहे. तर कुटुंबाला वाहतुकीसाठी 25 हजार रुपयांपर्यंतचा खर्चही मिळणार आहे. अपघाती मृत्यू झाल्यास अंतिम संस्कारासाठी 5 हजार व या विम्याअंतर्गत किमान दोन मुलांच्या शिक्षणासाठी 1 लाख रकमेचे प्रयोजन आहे. नाशिक विभागातून 4,518, तर मालेगाव विभागातून 14,948 ग्राहकांनी विमा उतरविला आहे.
अत्यंत माफक हप्त्यात जास्त लाभ देणार्या या योजनेचा फायदा जास्तीत जास्त लोकांना होण्यासाठी व्यापक प्रचार केला जाणार आहे. त्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे. – मोहन अहिरराव, प्रवर अधीक्षक.
हेही वाचा:
- सांगली : वाहनांच्या विमानिश्चितीत नवा पॅटर्न!
- मुंंबई : बनावट नोटा बनविणारी कर्नाटकची टोळी गजाआड
- वेटलिफ्टिंग : विकासला ‘रौप्य’; हरजितला ‘कांस्य’
The post नाशिक : टपाल विम्याला वाढती पसंती; माफक हप्ता : अवघ्या 299 रुपयांमध्ये 10 लाखांचे विमाकवच appeared first on पुढारी.