नाशिक : टाकाऊ डेबरेजची विल्हेवाट आता मखमलाबादला

टाकाऊ डेबरीज

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
महापालिकेच्या पाथर्डी शिवारातील प्रस्तावित जागेवर होणारा टाकाऊ बांधकाम साहित्य विल्हेवाट प्रकल्प आता मखमलाबाद शिवारात उभारला जाणार आहे. खत प्रकल्पासमोरील प्रस्तावित जागा संपादित करताना विलंब झाल्यामुळे संबंधित प्रकल्पाच्या ठेकेदाराला कार्यारंभ आदेश देण्यात अडचणी निर्माण होत होत्या. त्यामुळेच तत्कालीन आयुक्त रमेश पवार यांनी यासंदर्भातील जागा बदलाच्या ठरावाला हिरवा कंदील दाखविला.

शहरातील मध्यवर्ती ठिकाणांसह परिसरात तसेच नवनवीन कॉलनी भागांमध्ये मोठ्या प्रमाणावर शहराचा विस्तार होत आहे. विस्तार होत असताना शहरातील जुने वाडे, घरे, बंगल्यांच्या जागी मोठमोठ्या इमारती उभ्या राहत आहेत. अशा स्वरूपाचा विकास होत असताना त्या तुलनेत टाकाऊ बांधकाम साहित्य म्हणजे डेबरेजही मोठ्या प्रमाणावर निर्माण होत असल्याने या साहित्याची विल्हेवाट कुठे आणि कशी लावायची याबाबत अनेक प्रश्न निर्माण होत होते. अनेक लोक तसेच बांधकाम व्यावसायिकांकडून टाकाऊ बांधकाम साहित्य सार्वजनिक ठिकाणी तसेच रस्त्यांच्या लगत टाकले जात असल्याचे शहराच्या सौंदर्यातही बाधा निर्माण होत होती. तसेच अनेक लोक तर नदीच्या कडेला डेबरेज टाकत असल्याने नदीचे पात्रही अरुंद होण्यास कारणीभूत ठरत होते. टाकाऊ बांधकाम साहित्याच्या विल्हेवाटीसाठी व्यवस्था नसल्यामुळे या विद्रूपीकरणात वाढच होत होती. यामुळे केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत अभियानांतर्गत स्वच्छ शहर स्पर्धेतही नाशिकला कमी गुणांकन मिळत होते. यामुळेच मनपाने बांधकाम साहित्य विल्हेवाटीचा प्रकल्प उभारण्याचा निर्णय घेत खत प्रकल्पासमोरील स. क्र. 279/1/2 मधील जागाही निश्चित करण्यात आली होती. प्रकल्प उभारणीसाठी निविदा प्रक्रिया राबवित स्थायी समितीच्या मान्यतेने ठेकाही निश्चित करण्यात आला.

परंतु, प्रस्तावित जागेच्या भूसंपादनात भूसंपादन विभागाकडून प्रतिसाद मिळू शकला नाही. तसेच प्रस्तावित क्षेत्रातील काही भाग खासगी मालकीचा असल्याने जागा संपादनासाठी भूसंपादनात विलंब होत असल्यामुळे प्रकल्प उभारणी कामाचा करारनामा करून कार्यारंभ आदेश देण्यासाठी अडचणी निर्माण झाल्या होत्या.

21,800 चौ. मी. जागेवर प्रकल्प
तत्कालीन प्रशासक पवार यांनी नगर नियोजन व यांत्रिकी विभागाची बैठक घेत प्रकल्प उभारणीसाठी नवीन जागा सूचविण्याचे नगर नियोजन विभागाला आदेश दिले होते. त्यानुसार नगर नियोजन विभागाने मखमलाबाद शिवारातील सर्व्हे क्रमांक 323/2/2 मधील क्षेत्र पर्यायी जागा म्हणून सुचविले आहे. तत्कालीन आयुक्त पवार यांनी मंजूर केलेल्या ठरावानुसार मखमलाबाद शिवारातील स. क्र. 323/2/2 मधील 2,1800 चौ.मी. अर्थात सुमारे साडेपाच एकर क्षेत्रावर टाकाऊ बांधकाम साहित्य विल्हेवाट प्रकल्पाची उभारणी करण्यात येणार आहे.

हेही वाचा :

The post नाशिक : टाकाऊ डेबरेजची विल्हेवाट आता मखमलाबादला appeared first on पुढारी.