नाशिक : ट्रॅक्टरच्या धडकेत महाविद्यालयीन विद्यार्थिनीचा मृत्यू

नाशिक, सटाणा : पुढारी वृत्तसेवा
येथील महाविद्यालयातून शहराकडे पायी परत येणार्‍या विद्यार्थिनीचा ट्रॅक्टरच्या धडकेत जागीच मृत्यू झाला. शुक्रवारी (दि.14) दुपारी तीन वाजेच्या सुमारास हा अपघात घडला असून अश्विनी हिरामण घोडे (22, रा. देवळाणे) असे मृत्यूमुखी पडलेल्या मुलीचे नाव आहे.

अश्विनीने सटाणा महाविद्यालयातून नुकतेच बीएचे शिक्षण पूर्ण केले होते. पुढील उच्च शिक्षणासाठी आवश्यक कागदपत्रे घेण्यासाठी ती महाविद्यालयात आली होती.दुपारच्या सुमारास आपली बहीण व मैत्रिणींसोबत सटाणा शहराकडे पायी परत येत असताना आरम नदीवरील पुलाजवळ पाठीमागून आलेल्या ट्रॅक्टरने तिला धडक दिली. ती ट्रॅक्टर ट्रॉलीच्या पाठीमागील चाकात सापडून गंभीर जखमी झाली. उपस्थितांनी तिला तत्काळ शहरातील एका खासगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले. परंतु ती मृत झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

अश्विनी ही गरीब घरातील होतकरू विद्यार्थिनी होती. तिचे वडील मोलमजुरी व भाजीपाला विक्री करून मुलींचे शिक्षण करत होते. अश्विनी आणि तिची बहीण व भाऊ हे देखील मिळेल ते काम करून शिक्षण करीत होते. परंतु तिचा दुर्दैवीरित्या मृत्यू झाल्याने देवळाणे गावासह तालुकाभरात तळमळ व्यक्त होत आहे. ट्रॅक्टर चालकाविरोधात गुन्ह्याची नोंद करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.

हेही वाचा :

The post नाशिक : ट्रॅक्टरच्या धडकेत महाविद्यालयीन विद्यार्थिनीचा मृत्यू appeared first on पुढारी.