Site icon

नाशिक : ठाकरे गटात मुख्यमंत्र्यांना प्रवेश नाही…

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सोडून बाकी सर्व नेते – आमदार हे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात परततील, असा विश्वास ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केला. ना. शिंदे यांना आम्ही परत पक्षात घेणार नाही, असेही त्यांनी सांगितले. महाविकास आघाडी नाशिक महापालिकेसह लोकसभा – विधानसभा निवडणुका एकत्रित लढवेल, असे स्पष्ट केले. मालेगावमध्ये २६ तारखेला ठाकरे यांची उत्तर महाराष्ट्राची सभा होणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

खा. राऊत हे शुक्रवारी (दि. १७) नाशिक दौऱ्यावर आले असताना त्यांनी शासकीय विश्रामगृह येथे पत्रकारांशी संवाद साधला. राज्यात अराजकता निर्माण झाली असून, कायदा – सुव्यवस्थेचा बोजवारा उडाला आहे. आदिवासी बांधव रस्त्यावर उतरले असताना राज्यात सरकार आहे की नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे, असा घणाघात खा. राऊत यांनी केला. तसेच शिवसेना – भाजपचे नाव न घेता त्यांना कधी घरी जावे लागेल, याची माहिती असल्याने मंत्रिमंडळ विस्तार रखडल्याचा आरोप खा. राऊत यांनी केला. आगामी लोकसभा व विधानभा निवडणुकांना मविआ एकत्रित सामोरे जाईल. त्यावेळी जागावाटपात वाद होणार नाही अशी खात्री देताे, असेही ते म्हणाले. महापालिकांसंदर्भात चर्चा सुरू असून नाशिक, मुंबई, पुणे, ठाण्यासह अन्य मोठ्या महापालिकांमध्ये मविआने एकत्र लढण्याची इच्छा त्यांनी बोलून दाखविली. कोकणातील खेडमध्ये उद्धव ठाकरे यांची सभा पार पडली असून, राज्यातील अन्य ठिकाणी सभा घेण्याचे निश्चित केले आहे. त्यानुसार मालेगावमध्ये 26 तारखेला ठाकरेंची सभा होणार आहे, अशी माहिती राऊत यांनी दिली. मालेगाव हा शिवसेनेचा बालेकिल्ला असून तो गद्दारांचा नाही, असा अप्रत्यक्ष टोला त्यांनी पालकमंत्री दादा भुसे यांना लगावला. तसेच मुस्लीम समाज हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाच पाठिंबा देणार का? असा प्रश्न उपस्थित करताना राज्यातील मुस्लीम बांधव आमच्यासोबत असल्याचा दावा राऊत यांनी केला. हिरे कुटुंब हे राजकारणातील एक महत्त्वाचे कुटुंब आहे. अद्वय हिरे यांच्यावर मोठी जबाबदारी देण्यात येईल, असे सूतोवाच राऊत यांनी केले.

आज परिस्थिती वेगळी असती
नांदूरशिंगोटे (ता. सिन्नर) येथे उभारण्यात आलेल्या स्व. गोपीनाथ मुंडे स्मारकाच्या लोकार्पण सोहळ्यास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निमंत्रण नसल्याकडे खा. राऊत यांचे लक्ष वेधले असता, त्याबाबत आपल्याला माहिती नाही. स्मारकाच्या उभारणीत आदित्य ठाकरे यांचे योगदान असून त्यांनी पर्यटनमंत्री असताना स्मारकाला निधी दिल्याचे त्यांनी सांगितले. शिवसेना – भाजप युती टिकावी म्हणून स्व. मुंडे यांनी प्रयत्न केले होते. मुंडे व प्रमोद महाजन असते, तर आज वेगळी परिस्थिती असती, अशी भावना खा. राऊत यांनी व्यक्त केली.

हेही वाचा:

The post नाशिक : ठाकरे गटात मुख्यमंत्र्यांना प्रवेश नाही... appeared first on पुढारी.

Exit mobile version