नाशिक : ठाणगावला नळधारकांना पुन्हा मीटरसक्ती

water meter www.pudhari.news

नाशिक (सिन्नर) : पुढारी वृत्तसेवा
तालुक्यातील ठाणगाव ग्रामपंचायतीच्या वतीने नागरिकांना पुन्हा नळमीटरद्वारे पाणीपुरवठा करण्याचा ठराव ग्रामसभेत सर्वानुमते मंजूर करण्यात आला आहे. त्यामुळे ग्रामस्थांना चोवीस तास पाणीपुरवठा करण्यात येणार असल्याचे सरपंच नामदेव शिंदे यांनी सांगितले.

2007 मध्ये उंबरदरी धरणातून ठाणगावसह पाचगाव पाणीपुरवठा योजना ही चोवीस तास अखंडित चालणारी पाणीपुरवठा योजना सुरू झाली. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या माध्यमाने सरपंच नामदेव शिंदे यांच्या पुढाकाराने ही ग्रामपंचायत चोवीस तास अखंडित पाणीपुरवठा करणारी ही राज्यातील पहिली ग्रामपंचायत ठरली. सलग दोन पंचवार्षिक निवडणुकीत नामदेव शिंदे सरपंच राहिल्याने दहा वर्षे मीटरद्वारे पाणीपुरवठा योजना सुरळीत सुरू होती. मात्र, मध्यंतरीच्या काळात ही योजना विस्कळीत झाली. आता शिंदे तिसर्‍यांदा सरपंच झाल्याने त्यांनी ग्रामस्थांना विश्वासात घेऊन ठाणगाव परिसराला पुन्हा मीटरद्वारे पाणीपुरवठा करण्याचा निर्णय ग्रामसभेमध्ये सर्वानुमते घेण्यात आला. ठाणगावची रेकॉर्डला लोकसंख्या 6,215 असून, शासन नियमानुसार दरदिवशी 55 लिटर प्रतिमाणसी पाणीपुरवठा करणे बंधनकारक आहे. त्यानुसार दररोज साडेतीन लाख लिटर पाण्याची गरज आहे. पण प्रत्यक्षात मात्र 5 लाख लिटर पाणीसुद्धा कमी पडत आहे. नळधारकांची पाण्याची मागणी जास्त आहे. त्यामुळे उंबरदरी धरणात मुबलक प्रमाणात पाणीसाठा असतानादेखील केवळ विस्कळीत वीजपुरवठ्यामुळे कृत्रिम पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. ग्रामसभेमध्ये सरपंच शिंदे यांनी नळांना मीटर बसवावे, म्हणजे सर्व नळधारकांना समप्रमाणात पाणीपुरवठा होईल यासाठी ग्रामपंचायतीने सहा महिन्यांचा अवधी देण्यात आला आहे. ज्या नळधारकांनी डबल अनधिकृत नळकनेक्शन घेतले आहे, अशा नळधारकांवर कायदेशीर कारवाई करण्याचा निर्णय ग्रामसभेत घेण्यात आला. नळांना मीटर बसवले तर कृत्रिम पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार नाही. पाण्याची मागणी वाढली तरी ती पूर्ण करता येऊ शकणार आहे. काही नळधारकांनी मीटर बसविण्यास विरोध केला. मात्र, ग्रामस्थांनी नळांना मीटर बसविण्यास सहमती दर्शविल्याने सर्वानुमते ग्रामसभेत मीटरद्वारे पाणीपुरवठा करण्याचा ठराव संमत करण्यात आला.

नामदेव शिंदे

नळधारकांनी नळांना तोटी बसवलेली नसल्यामुळे पाण्याचा मोठ्या प्रमाणात अपव्यय होतो. मीटरद्वारे नळधारकांना मुबलक पाणी देण्यात येईल. त्यामुळे सदस्य व ग्रामस्थांच्या साथीने नळांना मीटरद्वारे पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेतला आहे. – नामदेव शिंदे, सरपंच.

बारामाही चालणारी योजना
सिन्नर तालुक्यातील पश्चिम भागाला वरदान ठरणारी व बारामाही चालणारी ही एकमेव नळ पाणीपुरवठा योजना आहे. 2007 मध्ये महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाच्या सहाय्याने ही पाणीपुरवठा योजना सुरू झाली. या योजनेत ठाणगावसह आशापूर (टेंभुरवाडी), पाडळी, हिवरे, पिंपळे या गावांचा समावेश आहे.

हेही वाचा:

The post नाशिक : ठाणगावला नळधारकांना पुन्हा मीटरसक्ती appeared first on पुढारी.